For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेरूरच्या जान्हवी ठाकूरचे भरतनाट्यम परीक्षेत यश

04:05 PM Feb 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
नेरूरच्या जान्हवी ठाकूरचे भरतनाट्यम परीक्षेत यश
Advertisement

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ; विशारद होण्याचा मिळविला बहुमान

Advertisement

कुडाळ -

कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची सुकन्या जान्हवी तुकाराम ठाकूर ही भरतनाट्यम नृत्य संगीत परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली असून सिंधुदुर्गातून प्रथम विशारद होण्याचा बहुमानही तिने पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नोव्हेंबर - डिसेंबर 2024 या सत्रातून कुडाळ येथील साईदरबार केंद्रातून झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ( मिरज ,मुंबई ) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत जान्हवी ठाकूर भरतनाट्यम या नृत्य विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली,तर नृत्य संगीत विशारद पदवी प्राप्त केली. जान्हवी हिने वयाच्या नवव्या वर्षापासून सिद्धाई डान्स कला अकॅडमीच्या संचालिका गुरुवर्या सौ. कविता राऊळ-शेट्ये यांच्याकडून या कला विषयाचे धडे घ्यायला सुरुवात केली.प्राथमिक ते विशारद पूर्ण पर्यंतचे शास्त्रीय प्रशिक्षण टप्प्या - टप्प्याने घेतले. या यशामध्ये आपल्या गुरुवर्यां कविता राऊळ यांचा महत्वाचा वाटा आहे,असे जान्हवीने सांगितले.या यशाबद्दल तिच्या आईवडिलांना विचारले असता , जान्हवी हिला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती. वयाच्या सहाव्या वर्षी सायकलचा टायर कंबरेभोवती फिरवून रिंगा नृत्य करतानाची नजाकत पाहून आमचा निर्णय पक्का झाला की, तिला आता आपण शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण वर्गात पाठविले पाहिजे आणि हाच खरा तिचा आयुष्यातला घेतलेला निर्णय आज आम्हाला या पदवीने मनाला समाधान करून जाणारा निर्णय वाटतो, असे त्यांनी सांगितले. जान्हवीने अनेक स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नामांकने पटकावली आहेत.त्याचबरोबर श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश सावंत यांच्या साथीने अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग, कर्नाटक मध्ये 101 पखवाजवादक आणि भरतनाट्यम अशा अनेक कार्यक्रमामध्ये सदाबहार नृत्य सादर करून छाप पाडली आहे.तसेच तिच्या यशात हार्मोनियमवादक व गायक अमित उमळकर (कुडाळ) यांचीही मोलाची साथ लाभली आहे. जगन्नाथ संगीत विद्यालय महेश सावंत यांच्या विद्यार्थीनी आणि जान्हवी हिची बहीण समृद्धी ठाकूर हिने भरतनाट्यम अंगाने तिला यशस्वी आणि महत्वपूर्ण पखवाज साथ दिली. संपूर्ण सिंधुदुर्गमधून विशारद व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत तिने सिंधुदुर्ग कलाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे जान्हवीच्या या यशाबद्दल सिद्धाई डान्स कला अकॅडमीच्या संचालिका कविता राऊळ यांनी जान्हवीचे विशेष कौतुक केलें आहे. तसेच सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.