श्रीदेवीच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये जान्हवी
जान्हवी कपूर बॉलिवूडची स्टारकिड असून तिचा ‘परमसुंदरी’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर तिचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. याचदरम्यान जान्हवीला आता स्वत:ची आई श्रीदेवी यांचा 36 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय चित्रपटाच्या रिमेकची ऑफर मिळाली आहे. श्रीदेवी यांचा 1989 साली ‘चालबाज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा रिमेक केला जाणार आहे. जान्हवीसाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ‘चालबाज’ चित्रपटाच्या रिमेकसाठी ती विशेष तयारी करणार आहे. याकरता तिने अनेकांशी सल्लामसलत करण्यास सुरुवात केली आहे.
36 वर्षांपूर्वी 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘चालबाज’ हा श्रीदेवीच्या आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तिने ‘अंजू’ आणि ‘मंजू’ अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. पंकज पराशर यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटातील तिच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेम लाभले होते. श्रीदेवीसोबत रजनीकांत आणि सनी देओल यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. याचबरोबर अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी, अन्नू कपूर, सईद जाफरी, शक्ती कपूर, अरुणा इराणी यासारखे कलाकारही दिसून आले होते. चित्रपटातील प्रत्येक गाणे गाजले होते.