केआरपीपी भाजपात विलिन आमदार जनार्दन रेड्डीचा भाजपमध्ये प्रवेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
कल्याण राज्य प्रगती पक्ष (केआरपीपी) सोमवारी भाजपात विलिन झाला असून या पक्षाचे प्रमुख नेते खाण उद्योजक गाली जनार्दन रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
बेंगळूरमधील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कोप्पळचे आमदार जनार्दन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केआरपीपी पक्ष विलिन करण्याची घोषणा केली. याप्रसंगी जनार्दन रे•ाRच्या पत्नी अरुणालक्ष्मी भाजपमध्ये दाखल झाल्या. उभयतांचे पक्षाचा झेंडा आणि शेला देऊन भाजपात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात जनार्दन रेड्डीचे एकेकाळचे खास मित्र व बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बी. श्रीरामुलू, बळ्ळारीचे खासदार वाय. देवेंद्रप्पा व इतर नेते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले, माजी मंत्री व आमदार जनार्दन रेड्डी यांच्या भाजपप्रवेशाने आपल्याला आनंद झाला आहे. कल्याण राज्य प्रगती पक्ष स्थापन करून त्यांनी स्वत:चा वेगळा राजकीय ठसा उमटविला होता. आता त्यांनी आपला पक्ष भाजपात विलिन केला आहे. त्यामुळे कल्याण कर्नाटक भागात भाजपला बळकटी प्राप्त झाली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. राज्यात भाजपला अधिक जागा मिळाव्यात, या एकमात्र उद्देशाने ते भाजपात दाखल झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.