जननायक जनता पक्षाचा ‘गेमओव्हर’?
हरियाणा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला आणि त्यांचा पक्ष जननायक जनता पक्षाचा अत्यंत दारुण पराभव झाला आहे. जजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा जिंकल्या होत्या. परंतु यावेळी पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. उचाना कलां मतदारसंघात दुष्यंत चौताला हे सहाव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांच्यासमोर माजी केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार बृजेंद्र सिंह या काँग्रेस उमेदवाराचे आव्हान होते. तर भाजपने देवेंद्र अत्री यांना मैदानात उतरविले होते. अत्री यांना या मतदारसंघात केवळ 32 मतांनी विजय मिळविला आहे. दुष्यंत यांचे बंधू दिग्विजय चौताला देखील डबवाली मतदारसंघात पराभूत झाले आहेत.
दुष्यंत यांच्या जजपने उत्तरप्रदेशच्या नगीनाचे खासदार चंद्रशेखर यांच्या पक्षाशी आघाडी केली होती. 2019 च्या निवडणुकीत जजप 10 जागा जिंकून हरियाणात किंगमेकर ठरला होता. मागील निवडणुकीनंतर भाजपसोबत आघाडी केल्याने जाट मतदार हे दुष्यंत चौतालांवर नाराज झाले होते. भाजपशी असलेली आघाडी संपुष्टात आणूनही जजप या सर्व मतदारसंघांमध्ये पराभूत झाला आहे.
चौताला परिवाराचा ‘पॅकअप’
हरियाणात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. राज्यात एकेकाळी प्रभावशाली राहिलेल्या चौताला परिवाराला जनतेने नाकारले आहे. अभय चौताला यांचा आयएनएलडी असो किंवा दुष्यंत चौताला यांचा जजप दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले ढासळले आहेत. केवळ आयएनएलडीचे अर्जुन चौताला हेच रानिया मतदारसंघातून विजयी झाले आहेत. रानिया मतदारसंघात अर्जुन सिंह यांचा मुकाबला रणजीत चौताला यांच्याशी होता, रणजीत चौताला हे अर्जुन यांचे नातलगच आहेत.