Jan Suraksha Kayda: जनसुरक्षा कायद्याच्या आडून हुकुमशाहीकडे वाटचाल, विविध ठरावांचे वाचन
अधिवेशनाच्या निमित्ताने या तालुक्याचे विकास धोरण ठरवणे आवश्यक आहे
कोल्हापूर : शासन मराठा आरक्षणात दुटप्पी भूमिका घेत आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले असे म्हणायचे आणि ओबीसींना तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे म्हणत ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे.
जनसुरक्षा कायद्याच्या आडून शासनाची हुकमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचा आरोप कॉ. अतुल दिघे यांनी केला. आजरा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय कम्युनिष्ठ पक्ष (लेनिनवादी) च्या तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. शांताराम पाटील होते.
प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले. यावेळी कॉ. दिघे यांनी आजरा तालुका अधिवेशन 2025 हे भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे महाराष्ट्रातील पहिलेच अधिवेशन होत असल्याचे सांगितले. या अधिवेशनाच्या निमित्ताने या तालुक्याचे विकास धोरण ठरवणे आवश्यक आहे. आजरा तालुका हा चळवळींचा तालुका असून येथील विविधांगी चळवळींचा आजही राज्यपातळीवर दबदबा आहे.
कॉ. शांताराम पाटील म्हणाले, संघटनेशिवाय गोरगरीबांना न्याय मिळू शकत नाही. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवण्याबरोबरच, ग्रामीण भागातील भाजी विक्रेत्यांना शहरात बसण्याची जागा देत नव्हते, केवळ संघटनेमुळे प्रश्न सोडवता आला.
तालुक्यातील अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ नागरिक, निवृत कर्मचारी पेन्शन वाढीचा प्रश्न, शेती पीकाला हमीभाव, जंगली जनावाराचा उपद्रव, वाढती महागाई आणि बेरोजगारी या विषयाबरोबरच तालुक्यातील साधनसामुग्रीचा विचार करून, वनसंवर्धन, बारमाही हक्काचे पाणी आणी उद्योग उभारणी आणि शैक्षणिक सोई सवलतीसाठी योग्य वाटचाल या अधिवेशनाच्या निमित्ताने पुढे घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावांचे वाचन कॉ. काशिनाथ मोरे यांनी केले. जनसुरक्षा कायदा रद्द करा, शक्तीपीठ नको कर्ज माफी करा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या. सर्वाना मोफत आरोग्य व शिक्षण द्या. गिरणीकामगाराना मुंबईत मोफत घर द्या. गाव पातळीवरील कुटुंब व संस्कृती नष्ट करणाऱ्या मालिका बंद करा.
कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे, कामाचे बारा तास रद्द करा. आजरा शहरात महिलांना स्वच्छतागृह बांधा. सर्व वृध्दांना 9 हजार पेन्शन द्या. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. कंत्राटीकरण रद्द करा व सर्व मानधनी कर्मचाऱ्यांना वेतन पेन्शन व ग्रॅच्युटी द्या. इत्यादी ठराव हात वर करून मांडण्यात आले.
अधिवेशनसाठी निरीक्षक म्हणून कृष्णा चौगुले (राधानगरी), गोपाळ गावडे (चंदगड), दीपक दळवी (मुंबई) आणि सुनील बारवाडे (इचलकरंजी) हे उपस्थित होते. गीता पोतदार यांनी महिलांचे प्रश्न आणि अंधश्रध्दा या विषयी मांडणी केली. सभासदाना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदूराव कांबळे, निवृत्ती मिसाळे, रघुनाथ कातकर, महादेव होडगे, नारायण राणे, अनीता बागवे, राजश्री कुंभार, सुधाताई कांबळे, सुमन कांबळे, नंदा वाकर, विद्या मस्कर, मनप्पा बोलके यांच्यासह गिरणी कामगार आणि सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन करून संजय घाटगे यांनी संजय घाटगे यांनी आभार मानले.