आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी जामनेर सज्ज
पृथ्वीराज व शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार : देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव : जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या 16 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम‘ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ 2 मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या महाकुंभात थराराची एक डुबकी मारण्यासाठी कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार असून, या दंगलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने रंगणाऱ्या कुस्तीत 50 लाडक्या ‘पैलवान‘ बहिणींच्या कुस्त्याही खेळविणार आहेत. एवढेच नव्हे तर या कुस्तीयुद्धाचा प्रारंभ आणि समारोप महिला कुस्तीनेच केला जाणार आहे.
महिला कुस्तीला प्राधान्य दिल्यामुळे ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडेल. तसेच महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची गाठ रोमानियन ऑलिम्पियन कॅटालिना क्सेंटशी पडेल. या स्पर्धेच्या निमित्ताने 9 देशांचे नामांकित मल्ल जामनेर गाठणार असून या महाकुंभाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ इराणच्या जलाल म्हजोयूबशी पंगा घेणार आहे तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड रोमानियाचा युरोपियन विजेता फ्लोरिन ट्रिपोनशी लढणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरीत पराभवामुळे पेटून उठलेला शिवराज राक्षेही आपली ताकद दाखवण्यासाठी जामनेर गाठणार आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह अनेक महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय पैलवानांना धोबीपछाड देण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.
अनेक आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग
भारतासह फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशांचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. स्पर्धेत प्रमुख 22 लढतींसह 300 पैलवानांच्याही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षिसांचा अक्षरशा वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी‘ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे.
स्पर्धेतील प्रमुख लढती
ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी वि. युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूला (एस्टोनिया), प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन), अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टन ऑलीम्पियन-रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन - मोल्दोवा), पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब (आशियाई पदकविजेता-इराण), हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन-जॉर्जिया), सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब), पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर आंतरराष्ट्रीय विजेता - दिल्ली.