For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jammu Kashmir Cloudburst जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये ढगफूटी ढिगाऱ्याखाली गाडली गेली वाहने : गुजरातमध्येही अतिवृष्टी : वाहतुकीवर परिणाम

08:38 PM Jul 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
jammu kashmir cloudburst जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये ढगफूटी ढिगाऱ्याखाली गाडली गेली वाहने   गुजरातमध्येही अतिवृष्टी   वाहतुकीवर परिणाम
Advertisement

► वृत्तसंस्था श्रीनगर, अहमदाबाद
जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ढगफूटी झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. पर्वतांवरून वाहून आलेले दगड अन् चिखल नागरी वस्तीपर्यंत पोहोचला आहे. तर रस्त्यांवरील अनेक वाहने या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. गुजरातच्या सूरतमध्ये मागील 24 तासांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. सूरत-नवसारी राज्य महामार्गावरही पाणी आल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. सूरतमध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील थथरीच्या वरील भागांमध्ये ढगफूटीनंतर अचानक पाणी, चिखल, खडक अन् गाळ शहरांमध्ये आला आहे. याच्या तावडीत सापडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर अनेक भागांमध्ये वाहतूक प्रभावित झाली आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट
उत्तरप्रदेशच्या वाराणसी, प्रयागराज, चंदौली आणि बरेलीमध्ये मंगळवारी अतिवृष्टी झाली आहे. तसेच राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. यातील 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पीलीभीतमध्ये पावसामुळे तलावाची पातळी वाढत त्यातील मगरी नागरी वस्तीत पोहोचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीची शक्यता
उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देहरादून, पौडी, हरिद्वार, उधम सिंह नगर, नैनीताल आणि बागेश्वरमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चारधाम यात्रामार्गावर पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisement

पंजाब-चंदीगडमध्येही अलर्ट
पंजाब आणि चंदीगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान पठाणकोट, होशियारपूर, रुपनगर आणि मोहाली येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फिरोजपूर, फाजिल्का, फरीदकोट, श्री मुक्तसर साहिब, भटिंडा आणि मानसा या जिल्ह्यांमध्येही प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.