जम्मू-काश्मीरची सामन्यावर पकड मजबूत
कर्नाटक 364 धावांनी पिछाडीवर,मयांक अगरवालचे नाबाद शतक
वृत्तसंस्था / हुबळी
येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात गुरूवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर जम्मू-काश्मीरने आपली सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या डावात 584 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर कर्नाटकाने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 220 धावा जमविल्या. कर्नाटकाचा संघ अद्याप 364 धावांनी पिछाडीवर आहे. मयांक अगरवालने नाबाद शतक नोंदवून कर्नाटकाचा डाव सावरला.
या सामन्यात जम्मू-काश्मीरने 6 बाद 527 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला जम्मू-काश्मीरने पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 57 धावांची भर घालत तंबूत परतले. जम्मू-काश्मीरच्या डावात शुभम पुंडीरने 2 षटकार आणि 12 चौकारांसह 121 धावा तर यावेर हसनने 13 चौकारांसह 88, कर्णधार पारस डोग्राने 8 चौकारांसह 70, अब्दुल समदने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 61, वाधवानने 9 चौकारांसह 70 तर साहील लोथ्राने 8 चौकारांसह 72 धावा झळकविल्या. युधवीर सिंगने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा केल्या. 173.1 षटकांत जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 584 धावांवर आटोपला. कर्नाटकातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 98 धावांत 5 तर शिखर शेट्टी, श्रेयस गोपाल, विद्याधर पाटील आणि विशाख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारापूर्वी जम्मू-काश्मीरचा पहिला डाव संपुष्टात आला.
त्यानंतर कर्नाटकाने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. पण सलामीचा केएल राहुल नबीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. उपाहारावेळी कर्नाटकाने पहिल्या डावात 1 बाद 35 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कर्नाटकाने आणखी तीन गडी गमविले. देवदत्त पडीकल कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. त्यानंतर अकिब नबीने करुण नायरचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. त्यानंतर या षटकातील पुढील चेंडूवर रवीचंद्रन स्मरणला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. कर्नाटकाची स्थिती 4 बाद 57 अशी केविलवाणी होती.
मयांक अगरवाल आणि श्रेयस गोपाल यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना पाचव्या गड्यासाठी 105 धावांची शतकी भागिदारी केली. चहापानावेळी कर्नाटकाने 4 बाद 144 धावा जमविल्या होत्या. अगरवाल 86 तर गोपाल 25 धावांवर खेळत होते. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये श्रेयस गोपाल युधवीरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 1 चौकारांसह 27 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने संघाचा डाव सांभाळणाऱ्या मयांक अगरवालने 153 चेंडूत 15 चौकारांसह शतक पूर्ण केले. त्याला कृतिक कृष्णाकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 58 धावांची भागिदारी केली. दिवसअखेर अगरवाल 17 चौकारांसह 130 तर कृष्णा दोन चौकारांसह 27 धावांवर खेळत आहे. 69 षटकाअखेर कर्नाटकाने पहिल्या डावात 5 बाद 220 धावा जमविल्या. जम्मू-काश्मीरतर्फे अकिब नबीने 32 धावांत 3 तर सुनीलकुमार आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
कर्नाटकाने आतापर्यंत आठवेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. पण यावेळी जम्मू-काश्मीरचा संघ पहिल्यांदाच रणजी चषक मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून जम्मू-काश्मीरचे पारडे कर्नाटकाच्या तुलनेत अधिक जड वाटते. गुरूवारी अंधुक प्रकाशामुळे पंचांनी निर्धारीत वेळेपूर्वी खेळ थांबविला.
संक्षिप्त धावफलक : जम्मू-काश्मीर प. डाव 173.1 षटकांत सर्वबाद 584 (शुभम पुंडीर 121, यावेर हसन 88, पारस डोग्रा 70, अब्दुल समद 61, वाधवान 70, लोथ्रा 72, युधवीर सिंग 30, अवांतर 35, प्रसिद्ध कृष्णा 5-98, विद्याधर पाटील, विशाख, श्रेयस गोपाल आणि शिखर शेट्टी प्रत्येकी 1 बळी), कर्नाटक प. डाव 69 षटकांत 5 बाद 220 (मयांक अगरवाल खेळत आहे 130, श्रेयस गोपाल 27, कृतिक कृष्णा खेळत आहे 27, राहुल 13, पडीकल 11, अवांतर 12, अकिब नबी 3-32, सुनीलकुमार आणि युधवीर सिंग प्रत्येकी 1 बळी).