For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

06:34 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
Advertisement

पुंडीरचे नाबाद शतक, यावर हसन आणि समद यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था / हुबळी

शुभम सिंग पुंडीरचे नाबाद शतक तसेच यावर हसन आणि अब्दुल समद यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या रणजी अंतिम सामन्यात दिवसअखेर जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 2 बाद 284 धावा जमवित मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. पुंडीर 117 धावांवर तर समद 52 धावांवर खेळत आहेत. शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 139 धावांची शतकी भागिदारी केली.

Advertisement

या सामन्यात जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी यजमान कर्नाटकाच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरने घेतल्यानंतर त्यांचा सलामीचा फलंदाज कामरान इक्बाल केवळ 6 धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर राहुलकरवी झेलबाद झाला. यावर हसन आणि शुभम पुंडीर या जोडीने दमदार फलंदाजी केली. उपाहारावेळी जम्मू-काश्मीरची स्थिती 34 षटकांत 1 बाद 104 अशी भक्कम होती. खेळाच्या पहिल्या सत्रात यावर हसनने 77 चेंडूत 10 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. उपाहारावेळी हसन 57 तर पुंडीर 38 धावांवर खेळत होते.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर पुंडीर आणि हसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 172 चेंडूत नोंदविली. पुंडीरने 100 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या सत्रात जम्मू-काश्मीरने आणखी एक गडी गमविताना 74 धावांची भर घातली. चहापानावेळी जम्मू-काश्मीरने 61 षटकांत 2 बाद 178 धावा जमविल्या होत्या. पुंडीर 64 तर पारस डोगरा 9 धावांवर खेळत होते. या सत्रामध्ये प्रसिद्ध कृष्णाने हसनला राहुलकरवी झेलबाद केले. हसनने 150 चेंडूत 13 चौकारांसह 88 धावा झळकविल्या.

खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि कर्णधार पारस डोगरा दुखापतीमुळे 9 धावांवर असतानाच निवृत्त झाला. नंतर पुंडीर आणि अब्दुल समद यांनी संघाला अधिक मजबूत स्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 105 धावांची शतकी भागिदारी केली. खेळाच्या शेवटच्या सत्रात पुंडीरने 186 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह आपले शतक पूर्ण केले. तर त्याने समदसमवेत तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 136 चेंडूत नोंदविली. समदने 64 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र या अंतिम सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरची फलंदाजी भक्कम झाली तर कर्नाटकाचे गोलंदाज फारसे प्रभावी ठरु शकले नाहीत. दिवसअखेर पुंडीर 221 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 117 तर समद 67 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 52 धावांवर खेळत आहेत. कर्नाटकातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 36 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : जम्मू-काश्मीर प. डाव 87 षटकांत 2 बाद 284 (शुभम पुंडीर खेळत आहे 117, यावर हसन 88, अब्दुल समद खेळत आहे 52, डोगरा दुखापतीने निवृत्त 9, कामरान इक्बाल 6, अवांतर 12, प्रसिद्ध कृष्णा 2-36).

Advertisement
Tags :

.