जम्मू-काश्मिर उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ बडोदा
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत जम्मू-काश्मिर संघाने बडोदा संघाचा 182 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान कर्नाटक आणि हरियाणा यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. विदर्भने हैदराबादचा 58 धावांनी पराभव केला.
जम्मू-काश्मिर आणि बडोदा यांच्यातील सामन्यात जम्मू-काश्मिरने बडोदा संघाला विजयासाठी 365 धावांचे आव्हान दिले होते. पण जम्मू-काश्मिर संघातील फिरकी गोलंदाज साहिल लोथराच्या अचूक गोलंदाजीसमोर बडोदा संघाचा डाव 182 धावांत आटोपला. लोथराने 75 धावांत 5 गडी बाद केले. दरम्यान सोलापूरमधील महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात महाराष्ट्रने पहिल्या डावात त्रिपुरावर आघाडी मिळविल्याने त्यांना 3 गुण मिळाले.
कर्नाटक आणि हरियाणा यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात हरियाणाला 3 गुण तर कर्नाटकाला 1 गुण मिळाला. कर्नाटकाने पहिल्या डावात 304 धावा जमविल्यानंतर हरियाणाने पहिल्या डावात 450 धावा केल्या. कर्नाटकाने दुसऱ्या डावात 8 बाद 294 धावांपर्यंत मजल मारली. नागपूरमधील सामन्यात विदर्भने हैदराबादचा 58 धावांनी पराभव केला. या सामन्यात विदर्भ संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेने 57 धावांत 6 गडी बाद करत सामनावीराचा बहुमान मिळविला.