For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीर पहिल्या रणजी जेतेपदासमीप

06:50 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीर पहिल्या रणजी जेतेपदासमीप
Advertisement

अकिब नबीचे 5 बळी, कामरान इक्बाल शतकानजीक, जम्मू-काश्मीर 477 धावांनी आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था, हुबळी

2025-2026 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथील केएससीएच्या मैदानावर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात अकिब नबी आणि कामरान इक्बाल यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर जम्मू-काश्मीरचा संघ शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पहिल्या रणजी जेतेपदाच्या समीप पोहोचला आहे. जम्मू-काश्मीरने कर्नाटकावर एकूण 477 धावांची आघाडी मिळविली आहे. वेगवान गोलंदाज अकिब नबीने 54 धावांत 5 गडी बाद केले तर कामरान इक्बालने नाबाद अर्धशतक (94) झळकविले.

Advertisement

कर्नाटकाने आतापर्यंत सातवेळा रणजी चषक पटकाविला आहे. पण यावेळी त्यांना जेतेपद मिळविण्यापासून जम्मू-काश्मीरने चांगलेच रोखले आहे. या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 584 धावांवर आटोपल्यानंतर कर्नाटकाने पहिल्या डावात 293 धावा जमविल्या. जम्मू-काश्मीरने 291 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळविल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात दिवसअखेर 4 बाद 186 धावा जमवित एकूण 477 धावांची आघाडी मिळविली आहे. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून जम्मू-काश्मीरच्या जेतेपदावर आता शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी राहिले आहे.

कर्नाटकाने 5 बाद 220 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 73 धावांत बाद झाले. कर्नाटकाच्या पहिल्या डावात मयांक अगरवालने 266 चेंडूत 21 चौकारांसह 160 धावा जमविल्या. तर कृतिक कृष्णाने 2 चौकारांसह 36 धावा जमविताना अगरवालसमवेत सहाव्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. लोत्राने कृतिक कृष्णाला पायचीत केले. त्यानंतर सुनील कुमारने विद्याधर पाटीलला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. मयांक अगरवाल आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला. अकिब नबीने त्याला पायचीत केले. शिखर शेट्टी नबीच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला तर युधवीरने प्रसिद्ध कृष्णाला 4 धावांवर बाद करुन कर्नाटकाचा पहिला डाव 93.3 षटकांत 293 धावांत संपुष्टात आणला. जम्मू-काश्मीरतर्फे अकिब नबीने 54 धावांत 5 गडी बाद केले तर सुनील कुमार आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी 2 तर लोत्राने 1 गडी बाद केला. यावर्षीच्या रणजी हंगामात नबीने सातत्याने दर्जेदार कामगिरी करताना सातव्यांदा एका डावात 5 गडी बाद केले आहेत.

जम्मू-काश्मीरने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण उपाहारापर्यंत त्यांनी 2 बाद 11 धावा जमविल्या. सलामीचा यावर हसन आणि शुभम पुंडीर हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. उपाहारानंतर सलामीचा कामरान इक्बाल आणि कर्णधार पारस डोगरा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. डोगराने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. चहापानावेळी जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात 28 षटकांत 3 बाद 89 धावा जमविल्या होत्या.

खेळाच्या शेवटच्या सत्रात जम्मू-काश्मीरने एकमेव गडी गमविताना 97 धावा जमविल्या. कामरान इक्बाल आणि अब्दुल समद यांनी चौथ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. समदने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. कामरान इक्बाल 160 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 94 तर साहील लोत्रा 2 चौकारांसह 16 धावांवर खेळत आहे. कर्नाटकातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 2 तर विशाख आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

ओमर अब्दुल्लांची उपस्थिती

रणजी स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या जम्मू-काश्मीर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी शुक्रवारी हुबळीच्या स्टेडियममध्ये आपली उपस्थिती दर्शविली. काहीवेळ त्यांनी आपल्या संघाचा खेळ पाहिला. या सामन्यातील पहिल्या दिवशी बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचे माजी क्रिकेट प्रशासक मिथुन मनहास उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक : जम्मू-काश्मीर प. डाव 173.1 षटकांत सर्व बाद 584, कर्नाटक प. डाव 93.3 षटकांत सर्वबाद 293 (मयांक अगरवाल 160, कृतिक कृष्णा 36, श्रेयस गोपाल 27, विशाख नाबाद 17, अवांतर 14, अकिब नबी 5-54, सुनील कुमार 2-51, युधवीर सिंग 2-55, लोत्रा 1-50), जम्मू-काश्मीर दु. डाव 57 षटकांत 4 बाद 186 (कामरान इक्बाल खेळत आहे 94, लोत्रा खेळत आहे 16, अब्दुल समद 32, डोगरा 16, अवांतर 23, प्रसिद्ध कृष्णा 2-42, विशाख व श्रेयस गोपाल प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.