जामगाव खून व घरफोडीचा गुन्हा उघडकीस; कर्जबाजारी आरोपी कलबुर्गीतून जेरबंद
सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरात घुसून 61 वर्षीय व्यक्तीची हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31) याला कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले.
25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजल्यापासून 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत जामगाव येथील एका घरात अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील अशोक भीमान्ना मुळे (वय 61) यांच्यावर घातक हत्याराने डोक्यात गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उचकटून सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले.
या प्रकरणी मृताचे पुत्र विजयकुमार अशोक मुळे यांच्या फिर्यादीवरून माढा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 229/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) आणि 331 (7) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने जामगावमध्ये तब्बल तीन दिवस तळ ठोकून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळाच्या परिसरातून मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांना आरोपीबाबत महत्त्वाचा सुगावा मिळाला.
गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागे जामगावचा रहिवासी अजयकुमार चव्हाण असल्याचा संशय पोलिसांना आला. तो मागील दोन वर्षांपासून जामगावऐवजी लऊळ येथे राहत होता आणि अधूनमधून जामगावला येत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचा संशय असल्याची चाहूल लागताच त्याने मोबाईल बंद करून फरार होण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी कर्नाटकातील कलबुर्गी परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले.
पोलिसांना आरोपी वाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर असल्याची माहिती मिळाली. वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अजयकुमार चव्हाण याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत आरोपी कर्जबाजारी झाल्याने पैशांची गरज होती आणि चोरीच्या उद्देशाने त्याने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. घरात प्रवेश करण्यासाठी त्याने घराच्या पाठीमागील पाइपचा वापर केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. आरोपीने गुन्हा करण्यासाठी यूट्यूबवर पाहिलेल्या पद्धतीचा वापर केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माढा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, चोरीला गेलेले दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याबाबत तपास केला जात आहे.