जांबोटी-खानापूर वाहतूक अर्धा दिवस ठप्प
ट्रक अडकल्याने जांबोटी-खानापूर राज्य मार्गावरील वाहतूक खोळंबली : प्रवाशांचे हाल
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर शंकरपेठ चढतीनजीक बुधवारी पहाटे अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला रुतल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बुधवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. यामुळे या रस्त्यावरील बससेवा देखील बंद झाल्याने खानापूर येथे जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवासी वर्गांचे अतोनात हाल झाले. बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मोडकळीला आलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावहून गोव्याला ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणून गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाकडे वळविल्यामुळे या मार्गावरून सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे.
वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जांबोटी-खानापूर रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे. तसेच जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची रुंदी केवळ 3.5 मीटर असल्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे बुधवारी पहाटे शंकरपेठ चढतीनजीक अवघड वळणावर दुसऱ्या वाहनाला बाजू देताना अवजड वाहतूक करणारा 14 चाकी ट्रक रस्त्यातच अडकल्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी इतर वाहनांना जागाच नसल्यामुळे बुधवारी पहाटेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता बंद झाल्यामुळे खानापूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व या भागातील नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दुपारी दोन वाजल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने रुतलेला ट्रक बाजूला हटविल्यानंतर दुपारनंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी
वास्तविक पाहता जांबोटी-खानापूर या रस्त्याची रुंदी केवळ 3.5 मीटर आहे. अरुंद रस्ता त्यातच अवघड वळणामुळे हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक समजला जातो. तसेच या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचे देखील पक्के खडीकरण करण्यात आले नसल्यामुळे या भागात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बाजूपट्ट्या वाहून जाऊन गटारीसदृश्य चरी पडल्या आहेत. रस्त्याची पार दुर्दशा झाली असून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुर्दशेत दिवसेंदिवस अधिकच भर पडणार असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालून जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावरून सुरू असलेल्या धोकादायक अवजड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.