गुलालोत्सवासाठी जांबावली सज्ज
भाविक करणार श्री दामबाबावर गुलालाची उधळण
मडगाव : जांबावलीचा प्रसिद्ध वार्षिक गुलालोत्सव आज मंगळवार दि. 25 मार्च रोजी धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. जांबावलीच्या शिशिरोत्सवाला गेल्या बुधवारपासून सुरूवात झाली असून गेले सहा दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले. आज शिशिरोत्सवाचा महत्त्वाचा दिवस असून आज दुपारी 3.30 वा. श्री रामनाथ देव मंदिराच्या प्रांगणात गुलालोत्सवाला सुरुवात होणार आहे.
या गुलालोत्सवाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्री दामबाबाच्या पालखीवर गुलालाची उधळण करणार आहेत. यंदाचा गुलालोत्सव धुमधडाक्यात व्हावा यासाठी आयोजक मठ ग्रामस्थ हिंदू सभेने गुलालोत्सवाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. शिवाय केपे पोलिसांनी वाहतूक आणि शिस्त राखण्यासाठीही सर्व उपाययोजना केल्या आहेत.
आज पहाटे श्री दामबाबाची पालखी रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल आणि दुपारी गुलालोत्सवानंतर परत मंदिरात नेली जाणार आहे. श्री दामबाबावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला सुरूवात करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. गुलालोत्सवात केवळ लाल गुलाल वापरात आणावा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री 12 वा. ‘संगीत सभा’ होणार आहे. बुधवारी सकाळी धुळपेटीने शिशिरोत्सवाची सांगता होणार आहे.