फिल्टर प्रकल्प, पायाभूत सुविधा, Chandgad मधील 'जांबरे' ग्रामपंचायत जिल्ह्यात नंबर वन!
गावच्या सुंदरतेमुळे जांबरे गावाला एक नवी ओळख मिळाली आहे
चंदगड : जांबरे ग्रामपंचायतीने स्वतःला सुंदर गाव बनवत चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच जिल्ह्यात प्रथम येण्याचा सन्मानही मिळविला आहे. स्व. आर. आर. आबा (पाटील) सुंदर गाव पुरस्कार योजनेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका 'स्मार्ट ग्राम' म्हणून निवडलेल्या ग्रामपंचायतींचे पुनर्मूल्यांकन जिल्हास्तरीय तपासणी समितीमार्फत केले होते.
त्यामध्ये जांबरे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. गावच्या सुंदरतेमुळे जांबरे गावाला एक नवी ओळख मिळाली आहे. जांबरे गाव कोल्हापूरपासून १३० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमध्ये, गर्द झाडीमध्ये, जंगली प्राण्यांच्या सहवासात बसलेले आहे.
परंतु तेथील सरपंच विष्णू गावडे, ग्रामविकास अधिकारी अश्विनी कुंभार, उपसरपंच रामकृष्ण गावडे, सदस्य, ग्रामस्थ, गावातील दानशूर व्यक्ती आणि महिलांच्या सहकार्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामपंचायतीने आकाशाला गवसणी घातली.
चंदगड तालुक्यामध्ये या गावाने एक नवा इतिहास रचला. कारण जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान आजपर्यंत चंदगड तालुक्यातील एकाही गावाला मिळाला नव्हता. मात्र या छोट्याशा गावाने नाविन्यपूर्ण उपक्रमाने ते करून दाखवले. गावामध्ये सायपन पद्धतीने २४ तास फिल्टर पाणीपुरवठा होत असून १०० टक्के घरांना पाणीपुरवठा केला जात आहे. फिल्टर प्रकल्प हा तालुक्यामधील पहिलाच आहे.
गावातील संपूर्ण गटर बंदिस्त असून सांडपाण्याचा योग्य पद्धतीने निचरा केला जातो. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प चालू केला आहे. गावामध्ये पायाभूत सुविधा अंतर्गत सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, सार्वजनिक क्रीडांगण, ग्रंथालय, व्यायाम शाळा, सार्वजनिक उद्यान तसेच महिला बचत गटामुळे गावच्या विकासाला मोलाचे योगदान लाभले.
प्लास्टिक बंदी अंतर्गत संपूर्ण जिल्हास्तरीय तपासणी समितीमार्फत तपासणी गावात कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. गावाची घरपट्टी, पाणीपट्टी १०० टक्के बसुली केली आहे. प्रत्येक घरामध्ये ओला कचरा, सुका कचरा करण्यासाठी डस्टबिन बाटप केले. त्यांची योग्य प्रमाणे विल्हेवाट केली जाते. गावातील रस्त्यांवर दुतर्फा वृक्ष लागवड केली असून रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअर पुनर्भरण, शाळा सुशोभीकरण, शाळेमध्ये सीसीटीव्ही, मुलांना टॅब बाटप केले तसेच सर्व वर्ग डिजिटल करण्यात आले.
अंगणवाडी डिजिटल केली, बनराई बंधारा, अशी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. वन्यप्राण्यांपासून गावाला त्रास असूनही बन्य प्राण्यांना या गावचे नागरिकत्व देऊन पर्यावरण रक्षणाचा नवा संदेश महाराष्ट्रासमोर उभा केला आहे. तसेच गावातील दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे यांच्या माध्यमातून जॅकवेल बांधकाम करून दिले आहे.
त्याचबरोबर अनेक दानशुरांनी गावाला हातभार लावलेला आहे त्यामुळेच आज जांबरे 'हरित व जलसमृद्ध' गाव म्हणून ओळख असलेले गाव आज 'स्वच्छ व सुंदर' म्हणूनही एक आदर्श ठरले. दुर्गम डोंगराळ भागातील कमी उत्पन्न असलेल्या या ग्रामपंचायतीने उल्लेखनीय काम करून जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान मिळवला त्याबद्दल या ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.