सडा येथील जलनिर्मल योजना अर्धवट
कंत्राटदार अन् अधिकारी गायब : ‘हर घर जलयोजना’ फक्त कागदावरच : ग्रामस्थांकडून योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप
वार्ताहर/कणकुंबी
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन (जेजेएम) योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात जलनिर्मल योजना राबविण्यात येत असून, काही ठिकाणी ‘हर घर जल योजना’ फक्त कागदावरच दिसत आहेत. त्याचाच नमुना म्हणजे पारवाड ग्राम पंचायतीच्या सडा गावातील जलनिर्मल योजना होय. 14 लाख रुपयांची सदर योजना अर्धवट अवस्थेत रखडली असून, जलजीवन मिशन पूर्ण केल्याचा फलक मात्र कंत्राटदाराने लावला आहे. सरकारच्या सर्व मूलभूत सुविधापासून वंचित व दुर्लक्षित असलेले सडा गाव. ऐतिहासिक वारसा लाभलेला सडा गाव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजमितीस गावात वीस कुटुंबे असून दोनशेच्या आसपास लोकसंख्या आहे. गावातील मराठी प्राथमिक शाळा पंधरा वर्षांपूर्वी शासनाने बंद केली. शिवाजी महाराजांचे धाकटे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सड्याचा ऐतिहासिक किल्ला इतिहासाची साक्ष आहे. एकेकाळी गजबजलेल्या या सडा गावात एकूण साठ ऐतिहासिक विहिरी होत्या, त्यापैकी आज अगदी मोजक्याच विहिरी अस्तित्वात आहेत. संह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर अगदी बिकट स्थितीत सडा गाव आहे. रस्ता, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण, वाहतूक अशा कोणत्याही मूलभूत सुविधा गावात नाहीत.
कामाची पाहणी करून कारवाई करा
गावात एकूण 14 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेला दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी मंजुरी दिली. केंद्र सरकारचे सहा लाख तीस हजार, राज्य सरकारचे सहा लाख तीस हजार तर समाज वर्गणी एक लाख चाळीस हजार रुपये असे एकूण चौदा लाख रुपयामधून दि. 18 मार्च 2022 रोजी कामाला सुरुवात केली होती. परंतु केवळ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असलेल्या झऱ्यापासून गावात लहानशी पाणी टाकी उभारली. मात्र गावातील एकाही नळाला पाणी आले नाही. पाण्याच्या टाकीतून पाणी वाहून जात असून कोणतेच काम व्यवस्थित झाले नाही. केंद्र सरकारची हर घर जल योजना सडा गावच्या अर्धवटच सोडून कंत्राटदाराने काढतापाय घेतला आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमतामुळे योजना व्यवस्थित राबविल्या जात नाहीत. सडा गावातील जलनिर्मल योजनेच्या अर्धवट स्थितीत पडलेल्या ‘हर घर जल’ कामात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप सडा ग्रामस्थांनी केला असून सदर अर्धवट कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सडा ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत
याबाबत ग्रा. पं. च्या अध्यक्ष भिकाजी गावडे यांना विचारले असता ते म्हणाले, सडा येथील जलजीवन मिशनच्या अर्धवट राहिलेल्या कामासंदर्भात कंत्राटदार आणि जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत, असे सांगितले. तसेच पीडीओ वीरेश सज्जन यांना विचारले असता अद्याप कंत्राटदाराने काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे अर्धवट स्थितीत असल्याने योजना ताब्यात घेतलेली नाही. योजना पूर्ण केल्यानंतरच ताब्यात घेऊन कार्यान्वित केली जाईल असे सांगितले.