जळगावमध्ये स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; 27 किलो सोने अन् साडेबारा लाखांची रोकड लंपास, निलंबित पोलीस उपनिरीक्षक मुख्य सूत्रधार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास चार दरोडेखोर भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. त्यानंतर बँकेतील 27 किलो सोने आणि साडेबारा लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, बँकेतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून घटनेची माहिती दिली. दरोडेखोर पळून जात असल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. विदगावजवळ एका आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी आणि पाठलाग करून अन्य आरोपींनाही ताब्यात घेतले. चारही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे दरोड्याचा मुख्य सूत्रधार शंकर जसक हा माजी पोलीस उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे. २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकाऱ्यासोबत बँक दरोड्याच्या प्रकरणात तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून तो कारागृहात होता.
कारागृहात असताना त्याची खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गजानन पवार याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर जवळिकीमध्ये झाले आणि दोघांनी मिळून बँक लुटण्याचा कट रचल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या कटात अंकुश चव्हाण आणि श्रवण चव्हाण या अन्य दोघांना सहभागी करून घेण्यात आले होते.
ठरलेल्या योजनेनुसार चौघांनी भोकर येथील स्टेट बँकेवर दरोडा टाकला. मात्र, बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता, ग्रामस्थांचा पाठलाग आणि पोलिसांची नाकाबंदी यामुळे त्यांचा पलायनाचा प्रयत्न फसला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींनी दरोड्याचे नियोजन कसे केले, कारागृहातून हा कट कसा रचला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
