महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आयसीसी पुरस्कारासाठी जैस्वालची शिफारस

06:22 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

आयसीसीतर्फे पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंची प्रत्येक महिन्यात त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी निवड केली जाते. आता फेब्रुवारी महिन्यासाठी आयसीसीच्या या पुरस्काराकरता पुरूष विभागात भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालची शिफारस करण्यात आली आहे. या विभागातील या पुरस्काराकरिता भारताचा जैस्वाल, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि लंकेचा पी. निशांका यांच्यात ही चुरस राहिल.

Advertisement

2024 च्या फेब्रुवारी महिन्यासाठी पुरूष आणि महिलांच्या विभागातील या पुरस्काराकरिता शिफारस केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहिर करण्यात आली. इंग्लंड बरोबर सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालची कामगिरी सातत्याने दर्जेदार होत असून तो या मालिकेत पहिल्या 4  कसोटींमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैस्वालची आयसीसीच्या या पुरस्काराची पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली आहे. डावखुऱ्या जैस्वालने या मालिकेतील 4 कसोटीत 655 धावा जमविल्या असून 22 वर्षीय जैस्वालने विशाखापट्टनम आणि राजकोट येथील कसोटी सामन्यात सलग दोन द्विशतके झळकवली आहेत. जैस्वालच्या या कामगिरीमुळे भारताने या मालिकेतील सलग 3 कसोटी जिंकून इंग्लंडवर 3-1 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. राजकोटच्या कसोटीमध्ये जैस्वालने कसोटीतील एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. जैस्वालने 12 षटकार नोंदविले. तसेच या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने सर्वाधिक धावा जमविण्याच विक्रमही केला आहे. फेब्रुवारी महिना अखेर जैस्वालने 112 धावांच्या सरासरीने 560 धावा जमविल्या असून त्यामध्ये दोन द्विशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाठोपाठ दोन द्विशतके नोंदविणारा जगातील तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे. जैस्वालने हा पराक्रम आपल्या वयाच्या 22 वर्षे 49 दिवस झाले असताना केला. कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी असा पराक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी दिवंगत क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि भारताचा माजी कसोटीवीर विनोद कांबळी यांनी केला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यम्सनने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत दर्जेदार कामगिरी केली. त्याने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन शतके नोंदवून आपल्या संघाला मालिका विजय मिळवून दिला. हॅमिल्टनची कसोटी जिंकून न्यूझीलंडने फेब्रुवारी अखेर विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये दुसरे स्थान मिळविले. न्यूझीलंडने अलिकडच्या कालावधित पाच पैकी तीन कसोटी जिंकल्या आहेत.

गेल्या महिन्यात आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत विविध कसोटी मालिकांमध्ये विविध देशांच्या फलंदाजांनी दर्जेदार कामगिरी केल्याचा आढावा आयसीसीने घेतला आहे. त्याचप्रमाणे लंकेतर्फे वनडे क्रिकेट प्रकारामध्ये पी. निशांकाने दर्जेदार कामगिरी केली आहे. लंकेच्या निशांकाने अफगाण विरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली. सलामीचा फलंदाज निशांकाने पहिल्या वनडे सामन्यात 139 चेंडूत नाबाद 210 धावांची खेळी केली होती. त्यानंतर या मालिकेत त्याने उर्वरित 2 सामन्यात अधिक धावा जमविल्या. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये निशांकाने 101 चेंडूत 118 धावांची खेळी केली होती. तसेच टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने अर्धशतकही झळकवले. वनडे मालिकेत निशांकाने 346 धावा तर टी-20 मालिकेत त्याने 91 धावा जमविल्याने आयसीसीने त्याची या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील या पुरस्काराकरीता महिलांच्या विभागात संयुक्त अरब अमिरात महिला संघातील कविशा इगोदागे आणि इशा ओझा यांची तर ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँडची शिफारस केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#sports
Next Article