For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयशंकर यांचे अमेरिकेला प्रयाण

06:51 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जयशंकर यांचे अमेरिकेला प्रयाण
Advertisement

दुर्मिळ धातूंसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग

Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री. एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतातून प्रयाण केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांनी दुर्मिळ धातू उत्पादनाच्या संदर्भात एका जागतिक मंत्रीस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत सहभाग घेण्यासाठी अमेरिकेने भारताला निमंत्रित केले असून जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Advertisement

या तीन दिवसांच्या दौऱ्यात जयशंकर अमेरिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतील, अशी माहिती देण्यात आली. गेले जवळपास एक वर्ष भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंबंधी चर्चा केली जात आहे. तथापि, अद्याप ही चर्चा फळास आलेली नाही. जयशंकर या संभाव्य कराराच्या संदर्भातही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत काय, यासंबंधी उत्सुकता आहे.

परिषद कशासाठी...

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आयोजित केलेली ही परिषद अत्यंत महत्वाची असल्याचे मानण्यात येत आहे. दुर्मिळ धातू हे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि वाहन निर्मिती उद्योग यांच्यासाठी अत्यावश्यक आहेत. सध्या या धातूंचे खाणकाम आणि उत्पादन यांच्यावर चीनचा एकाधिकार आहे. एकटा चीन जगाच्या आवश्यकतेपैकी 70 टक्के पुरवठा करतो. चीनच्या या वर्चस्वामुळे जगात असमतोल निर्माण झाला आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे या धातूंच्या पुरवठा साखळ्या सुरक्षित आणि सुस्थितीत रहाव्यात, यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून अनेक देशांचा एक गट स्थापन केला आहे. भारतालाही या गटात समाविष्ट करुन घेण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत.

व्यापार करार पूर्ततेच्या दृष्टीने...

सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विषयक आणि भागीदारीविषयक संबंध तणावपूर्ण आहेत. जयशंकर यांच्या दौऱ्यामुळे हा तणाव निवळण्यास साहाय्य होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांच्याशी, या परिषदेच्या निमित्ताने स्वतंत्र चर्चा करणार आहेत. 29 जानेवारीला जयशंकर यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत सर्जियो गोर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. ही चर्चा सकारात्मक आणि भविष्यवेधी झाली असून यापुढे दोन्ही देशांचे संबंध अधिकाधिक बळकट होतील, अशी प्रतिक्रिया गोर यांनी या चर्चेनंतर ‘एक्स’वर प्रसारित केली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील करारासंदर्भात पुन्हा वातावरणनिर्मिती होत आहे.

पाकिस्तानला नाही निमंत्रण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि पाकिस्तानचे सेनाप्रमुख मुनीर यांच्यात सध्या जवळचे संबंध असल्याचे दिसून येत आहे. तथापि, अमेरिकेने या महत्वपूर्ण परिषदेचे आमंत्रण पाकिस्तानला दिलेले नाही, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. आपल्याकडे दुर्मिळ धातूंचे मोठे साठे आहेत, असा दावा पाकिस्तानने केला होता. ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्ताचे नेते शहाबाझ शरीफ आणि त्या देशाचे सेनाप्रमुख मुनीर यांनी या दुर्मिळ धातूंच्या बॅगसह अमेरिकेचा दौरा केला होता आणि ट्रंप यांची भेटही घेतली होती. तथापि, आता मात्र, स्थितीत काहीतरी परिवर्तन घडल्याचे दिसून येत असून पाकिस्तानला या परिषदेचे निमंत्रण नसल्याने तोही एक चर्चेचा विषय आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.