अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा
आयातशुल्काच्या निर्णयाची पार्श्वभूमी : द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चेला देणार वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांनी आयातशुल्कावरून उद्भवलेल्या तणावादरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावर लवकरात लवकर सहमती निर्माण करण्यावर मंगळवारी चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 2 एप्रिलपासून 26 टक्के प्रत्युत्तरात्मक आयातशुल्क लादले आहे. 5 एप्रिलपासून 10 टक्के आयातशुल्क लागू झाले असून उर्वरित 16 टक्के आयातशुल्क 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर पहिल्यांदाच भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्याशी व्यापार आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
दोन्ही देशांच्या विदेशमंत्र्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेला वेग देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. जयशंकर यांनी रुबियो यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री रुबियो यांच्याशी चर्चा केली असून आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराच्या महत्त्वावर सहमत झालो आहोत, असे जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे.
भारत आणि अमेरिकेच्या व्यापार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी 26-29 मार्च या कालावधीत दिल्लीत द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चेची एक फेरी पूर्ण केली होती आणि पुढील चर्चेच्या रुपरेषेला अंतिम स्वरुप दिले होते. दोन्ही देशांचे लक्ष्य सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरुप देण्याचे आहे.
भारत-प्रशांत, भारतीय उपखंड, युरोप, मध्यपूर्व आशिया आणि कॅरेबियन क्षेत्रावरही रुबियो यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे. परंतु चर्चेचा अधिक तपशील त्यांनी दिला नाही. भारताने आतापर्यंत अमेरिकेच्या शुल्कावर प्रत्युत्तरात्मक पाऊल उचललेले नाही. भारत सरकार चालू वर्षात द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या भागाला पूर्ण करण्याची अपेक्षा बाळगून असल्याने भारताच्या आयातशुल्कात मोठ्या प्रमाणात कपात होईल आणि अमेरिकेच्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ व्यापक प्रमाणात उपलब्ध होईल, यातून ट्रम्प प्रशासनाच्या भूमिकेत नरमाई येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. अमेरिकेच्या आयातशुल्काचे बारकाईने अध्ययन केले जात असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
वाणिज्यमंत्र्यांचा पुढाकार
तर अमेरिकेचे आयातशुल्क आणि त्याच्या भारतीय उद्योगांवरील प्रभावाच्या भीतीदरम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे लवकरच भारतीय निर्यातदारांशी चर्चा करू शकतात. ही बैठक बुधवारी होण्याची शक्यता असून यात मंत्रालयाचे अधिकारी आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायजेशन (एफआयईओ) आणि निर्यात संवर्धन परिषदांच्या (एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) प्रतिनिधींसोबत अन्य उद्योगांशी निगडित लोक सामील होऊ शकतात.
आयातशुल्कामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता
अमेरिकेच्या प्रशासनाकडून भारतीय उत्पादनांवर 26 टक्के आयातशुल्क लादण्याच्या घोषणेनंतर विशेष स्वरुपात लघू आणि मध्यम उद्योगाशी निगडित निर्यातदार स्वत:च्या व्यापारावर पडणाऱ्या प्रभावावरून चिंतेत आहेत. याचा प्रभाव कमी करण्यासाठी हे उद्योग सरकारकडून प्रोत्साहन निधीची मागणी करत आहेत. भारतीय औषध निर्यातदार वाणिज्य मंत्रालयासोबत सातत्याने चर्चा करत आहेत.