जयशंकर यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
ट्रंप यांच्या शपथविधीसाठी आमंत्रणाचा मुद्दा पेटला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथविधीला येण्याचे आमंत्रण मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री. एस. जयशंकर हे अमेरिकेला डिसेंबरमध्ये गेले होते, असा आरोप केलेल्या राहुल गांधी यांच्यावर जयशंकर यांनी जोरदार टीका केली आहे. आपले राजकारण साध्य करण्यासाठी गांधी धडधडीत खोटी विधाने करीत आहेत. अशा विधानांमुळे भारताची प्रतिमा डागाळते याचे भान त्यांना नाही, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेत भाषण करताना हे विधान केले होते. जयशंकर यांनी गेल्या डिसेंबरमध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी कार्यक्रमाचे आमंत्रण ट्रंप यांनी द्यावे, यासाठी प्रयत्न केले होते. असे प्रयत्न देशाची शान घालवितात, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. तसेच, यासाठी त्यांनी केंद्र सरकारलाही दोष दिला होता. मात्र, गांधी यांचे विधान पूर्णत: असत्य आहे. ते राजकीय हेतूने केलेले आणि अफवांवर आधारित विधान असून अशा विधानांचे परिणाम काय होतात, याचा विचार त्यांनी करावा, अशी टीका त्यांनी केली.
अशा कार्यक्रमांना जात नाहीत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा शपथविधीच्या कार्यक्रमांना सहसा जात नाहीत. ती पद्धती त्यांनी ठेवलेली नाही. माझा अमेरिका दौरा द्विपक्षीय संबंध भक्कम करण्यासाठी होता. शपथविधी कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा मुद्दा कोणाशीही चर्चा करताना उपस्थित झाला नाही. माझ्या अमेरिकेच्या दौऱ्याचा उद्देश तो नव्हताच. त्यामुळे अशी खोटी विधाने केली जाऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची ट्रंप यांच्याशी चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. ही चर्चा बराच काळ चालली होती. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केला. ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या महिन्यात अमेरिकेला येण्याचे आवाहन केले आहे. त्यादृष्टीने दिल्लीत सज्जता केली जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.