For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युएन’च्या महासभेसाठी जयशंकर जाणार न्यूयॉर्कला

06:32 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘युएन’च्या महासभेसाठी  जयशंकर जाणार न्यूयॉर्कला
Advertisement

26 सप्टेंबर रोजी भारताची भूमिका मांडणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढील आठवड्यात न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राच्या उच्चस्तरीय सप्ताहात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी यासंबंधीची अधिकृत घोषणा करताना 26 सप्टेंबर रोजी ते महासभेत भारताची बाजू मांडतील असे जाहीर केले. मंत्रालयाच्या वेबसाईटवरील निवेदनानुसार, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राच्या उच्चस्तरीय सप्ताहात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

Advertisement

परराष्ट्र मंत्रालयाने जयशंकर यांच्या भाषणाची तारीखही जाहीर केली आहे. परराष्ट्रमंत्री 26 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राच्या उच्चस्तरीय अधिवेशनात भारताची भूमिका मांडतील. त्याचबरोबर या काळात ते अनेक बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांमध्येही सहभागी होतील. संयुक्त राष्ट्र महासभेचा उच्चस्तरीय सप्ताह 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान होत आहे. सर्वसाधारण चर्चा 22 ते 26 सप्टेंबर आणि त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी होईल. या बैठकीदरम्यान, अनेक देशांचे सर्वोच्च नेते आणि वरिष्ठ प्रतिनिधी जागतिक शांतता, सुरक्षा, आर्थिक आव्हाने, हवामान बदल, महामारीला प्रतिसाद आणि अणुशस्त्रs यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर आपले विचार मांडतील.

एस. जयशंकर जागतिक मुद्यांवर भारताची भूमिका जगासमोर मांडतील. जग अनेक भू-राजकीय संघर्ष, आर्थिक दबाव आणि ऊर्जा व अन्नधान्याच्या किमतींशी संबंधित आव्हानांचा सामना करत असताना ही बैठक होत आहे. यावेळी, संयुक्त राष्ट्र महासभेत वाढत्या समुद्र पातळीमुळे निर्माण होणारा धोका, हवामान बदलाचा सामना करण्यासाठीचे उपाय, महामारी प्रतिबंध आणि अणुशस्त्रांचे संपूर्ण निर्मूलन यांसारख्या मुद्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.

Advertisement
Tags :

.