जयशंकर-सुलीव्हनमध्ये द्विपक्षीय चर्चा
विभागीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीव्हन आणि भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी एकमेकांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आहे. सोमवारी दुपारी झालेल्या या चर्चेत अनेक विभागीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेत 20 जानेवारीला सत्तांतर होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यशस्वी ठरलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. नवे राष्ट्राध्यक्ष सत्तेवर येण्यापूर्वीचा हा कोणत्याही अमेरिकन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा अखेरचा भारतदौरा आहे. अमेरिकेत नवी सत्ता आल्यानंतर नव्या सत्ताधीशांशी भारताला नव्याने चर्चा करावी लागणार आहे. तरीही जेक सुलीव्हन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत आहे. कारण, या दौऱ्यातील चर्चा पुढच्या काळातही मार्गदर्शन ठरणार आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.
सुलीव्हन यांचे महत्त्वाचे योगदान
जयशंकर आणि सुलीव्हन या दोन्ही नेत्यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळातील भारत-अमेरिका संबंधांचा आढावा सोमवारच्या चर्चेत घेतला. भारताशी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सुलीव्हन यांनी केलेले व्यक्तिगत योगदान अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे, अशी भलावण जयशंकर यांनी केली. अमेरिकेशी भविष्यकाळात याच दिशेने संबंध आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. बायडेन यांच्या प्रशासन काळात दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांनी अधिक ऊंची गाठली होती. हीच प्रक्रिया पुढे चालविण्याचा प्रयत्न भारताकडून अमेरिकेच्या नव्या प्रशासनकाळात होणार आहे.
डोवाल यांच्याशीही चर्चा
जेक सुलीव्हन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही विविध विषयांवर व्यापक चर्चा केली. आयसीटीई आणि द्विपक्षीय संरक्षण संबंध या मुद्द्यांवर या चर्चेत भर देण्यात आला होता, अशी माहिती नंतर देण्यात आली होती. गेल्यावर्षी दोन्ही देशांनी त्यांची एकमेकांशी असलेली जवळीक अधिक बळकट करण्यासाठी परिवर्तनात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाच्या फलितावरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असल्याचे समजते.
संरक्षण संबंधांमध्ये निकटता
मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षणसंबंध दृढ करण्यावर विशेषत्वाने भर देण्यात आला होता. याशिवाय, अवकाश संशोधन सहकार्य, धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य, सुरक्षा प्राधान्यक्रमाचे विषय आणि प्रशांत-भारतीय क्षेत्रातील सहकार्य या मुद्द्यांवर दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. या सर्व घडामोडींचा सर्वंकष आढावा या भेटीत घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारताला उत्सुकता नव्या प्रशासनाची
डोनाल्ड ट्रम्प हे 2016 ते 2020 या काळातही अमेरिकेचे अध्यक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री असल्याचे दिसून आले होते. आता ट्रम्प यांचा दुसऱ्या कार्यकाळाचा प्रारंभ होत आहे. या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ होईल अशी भारताला अपेक्षा आहे. यासंबंधीची स्थिती 20 जानेवारीनंतर स्पष्ट होणार आहे.
ड्रोन कराराचे भवितव्य
गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्यात अत्याधुनिक प्रेडेटर ड्रोनसंबंधीचा खरेदी करार झाला होता. 4 अब्ज डॉलर्सना भारत अशी 31 ड्रोन्स अमेरिकेकडून विकत घेणार आहे. ही ड्रोन्स भारतीय सैन्यदलांच्या मारक शक्तीत मोठी भर घालतील अशी शक्यता आहे. ही ड्रोन्स भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी महत्त्वाची ठरणार आहेत. अमेरिकेत 20 जानेवारीला नवे प्रशासन स्थानापन्न झाल्यानंतर या करारासंबंधी पुढच्या हालचाली ठरणार आहेत.