पंतप्रधान मोदी यांना भेटले जयशंकर
बांगलादेशातील हिंदूविरोधी अत्याचारांवर चर्चा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी चर्चा केली आहे. त्या देशात हिंदूंचे जीवन आणि मालमत्ता यांना गंभीर धोका निर्माण झाला असून भारताने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. चार दिवसांपूर्वी त्या देशात प्रमुख हिंदू नेते चिन्मोय कृष्णदास यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक करण्यात आली नसून त्यांचे अपहरण बांगला देश पोलिसांनी केले आहे, असा आरोप त्या देशातील हिंदू संघटनांनी केला आहे. दास यांना जामीनही नाकारण्यात आला आहे. दास यांच्या अटकेनंतर पुन्हा त्या देशात हिंदूविरोधी हिंसाचार उफाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर यांनी या हिंसाचारासंबंधी चर्चा केली असून भारत या परिस्थितीत काय करु शकतो, याची चाचपणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जयशंकर वक्तव्य करणार
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर हे संसदेत वक्तव्य करणार आहेत. मात्र, सध्या विरोधकांनी संसदेत गदारोळ करण्यास प्रारंभ केल्याने कामकाजाचे पहिले तीन दिवस वाया गेले आहेत. दोन्ही सदनांमध्ये शांतता निर्माण झाल्यास आपण वक्तव्य करण्यात सज्ज आहोत, असे प्रतिपादन जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. बांगलादेशातील स्थिती गंभीर असून तेथील सरकारने हिंदू आणि इतर अल्पसंख्य समुदायांच्या विरोधात होत असलेल्या अत्याचारांसंबंधात कारवाई करावयास हवी. अन्यथा, भारताला पुढचे पाऊल उचलावे लागेल, अशी चर्चा सध्या होत आहे. बांगला देशच्या प्रशासनाला भारताची तीव्र नाराजी कळविण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
200 हून अधिक हल्ले
5 ऑगस्ट 2024 या दिवशी बांगलादेशात सत्तांतर झाले. पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. या सत्तांतरानंतर तेथे अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. नोबेल पारितोषक विजेते मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून नेमण्यात आले. हसीना यांनी सत्ता गेल्यानंतर तेथील इस्लामी धर्मांध संघटनांनी हिंदूंना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. तेव्हापासून आजवर त्या देशात किमान 200 हल्ले हिंदूंवर करण्यात आले आहेत. अनेक हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. तसेच हिंदूंची घरे आणि मालमत्ता जाळण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही, तर भारताला काही ना काही कारवाई करावी लागेल. भारत स्वस्थ बसू शकत नाही, असा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे.
भारताला धोका
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत, तर त्यांचे भारतात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्यांच्यामध्ये मिसळून अनेक दहशतवादीही भारतात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असून भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते. तशी स्थिती निर्माण होण्याआधीच भारताने हालचाल केली पाहिजे, असा दबाव आता भारतावरही दबाव येत आहे. त्यामुळे भारत नेमके काय करणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. सध्या भारताने केवळ शाब्दिक कारवाई केली आहे.
अमेरिकेतील हिंदू संघटनांची मागणी
अमेरिकेतही बांगला देशातील घटनांचे पडसाद उमटत असून तेथील हिंदू संघटनांनी बांगलादेशवर आर्थिक निर्बंध लादावेत अशी मागणी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याकडे केली आहे. अमेरिका जगभरात मानव अधिकारांचा जयघोष करते. मग बांगलादेशकडे अमेरिकेच्या अध्यक्षांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने विचारला आहे. अमेरिकेतील इतर हिंदू संघटनाही मोठ्या निदर्शनांचे आयोजन करीत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. बांगलादेश प्रशासनाला धडा मिळेल अशी कारवाई अमेरिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षित आहे. ती केल्यासच अमेरिकेचा मानवाधिकारांचा वारसा सिद्ध होणार आहे, असे वक्तव्य अमेरिकेतील काही हिंदू संघटनांच्या नेत्यांनी प्रसिद्ध केले आहे.