जैश, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हल्ल्याचा कट
गुप्तचर विभागाने सुरक्षा यंत्रणांना केले सतर्क
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुप्तचर विभागाने (आयबी) स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांना दहा पानी अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्याचे या अहवालात म्हटले आहे. 15 ऑगस्टला हल्ला करण्यासाठी दहशतवादी युएव्ही म्हणजेच मानवरहित हवाई वाहने आणि पॅराग्लायडरचा वापर करू शकतात, असेही आयबीचे म्हणणे आहे. या इशाऱयानंतर दिल्लीचे आयुक्त संजय अरोरा यांनी राजधानीतील विविध ठिकाणांचा आढावा घेतला. तसेच लाल किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली.
येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने आतापासूनच सोहळय़ाचा जल्लोष सुरू झाला आहे. या जल्लोषातच हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांकडून आखला जाण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्याबरोबरच ज्या भागात सर्वाधिक रोहिंग्या राहतात त्या ठिकाणांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांना कट्टरपंथी गटांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. लाल किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लाल किल्ल्यावर सर्वसामान्यांच्या प्रवेशावर अधिक कडक असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारने 15 दिवसांच्या कार्यक्रमात ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत यंदाचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे.