जयपूर पिंक पँथर्सचा योद्धाजवर विजय
अर्जुन देशवाल बनला ‘हजारी’ रायडर : 1000 रेड गुण घेणारा सातवा रायडर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
जयपूर पिंक पँथर्सने पीकेएलमधील चुरशीच्या लढतीत यूपी योद्धाजचा 33-30 अशा गुणांनी पराभव केला. या संघातील नीरज नरवालने मिळविलेले 9 गुण (7 रेड पॉइँट्स) हे या सामन्याचे वैशिष्ट्या ठरले. मात्र हा दिवस गाजवला तो अर्जुन देशवालने. प्रो कब•ाr लीगच्या इतिहासात 1000 रेड गुण मिळविणारा तो सातवा रायडर बनल्याने पिंक पँथर्सचा आनंद आणखी द्विगुणित झाला.
दोन्ही संघांनी संथ सुरुवात केल्यानंतर पिंक पँथर्सच्या अर्जुन देशवालने गुण मिळविण्यास सुरुवात केली. यूपी योद्धाजच्या गुणांचे खाते गगन गौडाने उघडले. या पूर्ण सामन्यात दोन्ही संघ आलटून पालटून गुण मिळवित होते. मात्र पूर्वार्धात जयपूर पिंक पँथर्सच अधिक वेळा आघाडीवर होते. कर्णधार अर्जुन देशवालला नीरज नरवालने उत्तम साथ दिली तर रझा मिरबाघेरी व सुरजीत सिंग यांनी बचावात भक्कम कामगिरी केली.
असे असले तरी दुसरे सत्र संपण्याच्या सुमारास यूपी योद्धाजने 17-15 अशी 2 गुणांची आघाडी घेतली होती. अर्जुनला सुमितने सुपर टॅकल केल्यामुळे त्यांना ही आघाडी मिळविता आली. याशिवाय भरत हुडाने मिळविलेले चार रेड गुण व एक टॅकल गुणाचाही त्यांना लाभ झाला. गगन गौडाने आक्रमणात व आशू सिंगने बचावात उत्तम काम करीत त्यांना पूरक साथ दिली.
यूपी योद्धाजने या सामन्यात भरपूर सुपर टॅकल्स केले. त्यांनी प्रथम नीरज नरवालला बाद केल्यानंतर धोकादायक ठरणाऱ्या अर्जुनला पकडले. दुसऱ्या सत्रात यूपी योद्धाजने जोरदार खेळ करीत जयपूर पिंक पँथर्सचे सर्व खेळाडू 12 व्या मिनिटाला पहिल्यांदा बाद केले. नंतर जयपूरसाठी नीरज नरवालने रेड गुण मिळविण्याची जबाबदारी स्वीकारली. यूपीसाठी हितेशने हाय फाईव्ह मिळविल्याने त्यांचा संघ शर्यतीत कायम राहिला. सामना एकतर्फी होतोय असे वाटत असताना अर्जुन देशवालने इतिहास निर्माण करणारी खेळी केली आणि 1000 रेड गुण सर्वात जलद गाठणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला. सुरेंदर गिलला त्याने हलकाचा स्पर्श करीत त्याने हे यश मिळविले.
अखेरच्या टप्प्यात सामन्याचे पारडे वर-खाली होत असताना रेझा मिरबाघेरीने हाय 5 मिळवित सामना संपवला. पण अंकुश राठीने सुरेंदर गिलविरुद्ध यशस्वी बचाव करीत जयपूरला 3 गुणांच्या फरकाने विजय मिळवून दिला.