फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे ‘जेल भरो’ आंदोलन
चन्नम्मा चौकात मानवी साखळी करत निदर्शने
बेळगाव : विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी ‘जेल भरो’ आंदोलन केले. चन्नम्मा चौक येथे मानवी साखळी करत गुंतवणूकदारांनी निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. मागील दहा वर्षांपासून गुंतवणूक केलेले पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी आक्रोश व्यक्त केला. पीएसीएल, साईप्रसाद, समृद्धजीवन, गरीमा, ग्रीगोल्ड यासह इतर कंपन्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल या आशेने सर्वसामान्यांनी आपल्याकडील तुटपुंजी रक्कम या कंपन्यांकडे जमा केली.
परंतु राज्यात 200 ते 250 लहान-मोठ्या गुंतवणूक कंपन्या बंद झाल्या असल्या तरी राज्य सरकारकडे अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. देशभर आंदोलन सुरू असल्याने बर्डस् अॅक्ट 2019 नुसार सरकारने ग्राहकांना पैसे परत करावे अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. मागील आठवडाभरापासून बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुंतवणूकदारांचे आंदोलन सुरू होते. परंतु या आंदोलनाला तितकेसे यश न मिळाल्याने अखेर मंगळवारी जेल भरो आंदोलन पुकारण्यात आले. सुरुवातीला राणी चन्नम्मा चौकात साखळी उपोषण करण्यात आले. पोलिसांनी सांगून देखील माघार घेण्यात न आल्याने अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे बराच काळ चन्नम्मा चौकातील वाहतूक खोळंबली होती.