अक्षय खन्नाच्या जागी ‘दृश्यम 3’मध्ये जयदीप
‘दृश्यम 3’ चित्रपटाच्या कास्टिंगवरून निर्मात्याने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. निर्माते कुमार मंगत पाठक यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे दमदार अभिनेता अक्षय खन्ना आणि जयदीप अहलावत यांच्यात तुलना होऊ लागली आहे. अलिकडेच प्रदर्शित ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणवीर सिंह आणि संजय दत्त यासारख्या कलाकारांसोबत त्याच्या उपस्थितीला चित्रपटाचे मोठे बलस्थान मानले गेले. याचदरम्यान ‘दृश्यम 3’ चित्रपटात अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत दिसून येणार असल्याची घोषणा निर्माते कुमार मंगत पाठक यांनी केली. याचबरोबर त्यांनी अक्षयपेक्षा जयदीप अधिक चांगला अभिनेता असल्याची टिप्पणी केली आहे. दृश्यम सारखी मोठी फ्रेंचाइजी कुठल्याही एका कलाकारावर निर्भर नसते, तर कहाणीच याची खरी शक्ती असल्याचे निर्मात्यांचे सांगणे आहे.
काही कलाकार मल्टी-स्टारर चित्रपटांच्या यशानंतर स्वत:ला सुपरस्टार समजू लागतात, केवळ एक यशस्वी चित्रपट एखाद्या अभिनेत्याला बॉक्स ऑफिसचा गॅरंटी स्टार करत नाही असे कुमार मंगत यांनी म्हटले आहे. जयदीपने वेबसीरिज आणि चित्रपटांमधील स्वत:च्या सशक्त अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाताल लोक, आक्रोश आणि अन्य प्रोजेक्टमधील भूमिकांचे कौतुक झाले आहे.