जयदीप आपटेला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी ; कडेकोट बंदोबस्तात दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर केले हजर
मालवण : प्रतिनिधी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दहा दिवस पोलिस कोठडीत असलेल्या डॉ. चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जयदीप आपटे देतोय विसंगत माहिती, सरकारी वकिलांचा दावा
याप्रकरणी सरकारी वकील ॲड तुषार भणगे यांनी माहिती दिली. ‘ ते म्हणाले आरोपी जयदीप आपटे हा विसंगत माहिती देतोय. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 13 तारखेपर्यंत (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात’, असे भणगे म्हणाले.