जय हनुमान प्रसन्न बैलजोडीकडे ‘चांदीची गदा’
दुर्गादेवी प्रसन्न, सांबरा लहान गटात विजेते : देसूर येथील बैलगाडी शर्यत अमाप उत्साहात
वार्ताहर/किणये
श्रीराम सेना हिंदुस्थान शाखा देसूर यांच्यावतीने आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये मोठ्या गटामध्ये आजरा गोवनकोपच्या जय हनुमान प्रसन्न बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून 51 तोळ्याच्या चांदीच्या गदेची मानकरी ठरली आहे. तर लहान गटात सांबरा येथील दुर्गादेवी प्रसन्न या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून 25 तोळ्याची चांदीची गदा मिळवली. बेळगाव-पणजी महामार्ग अल्मा मोटर्सच्या बाजुला काटगाळी क्रॉस देसूर येथे ही भव्य बैलगाडी शर्यत झाली. लहान व मोठ्या गटात अशा दोन विभागात शर्यत झाली. या शर्यतीमध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातून 168 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. चार दिवस सुरू असलेली ही बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी शौकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते रमाकांत कोंडुसकर, उमेश कुऱ्याळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
श्रीराम सेना हिंदुस्थान देसूर शाखेचे प्रमुख सातेरी नाईक व प्रशांत अरगू यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या गटामध्ये द्वितीय क्रमांक धारवाड व चिक्कमगाव येथील बसवेश्वर प्रसन्न या बैलजोडीने मिळवून 41 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. तृतीय क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस मुतगा येथील शिवाजी मल्लेशी कणबरकर यांच्या बैलजोडीने मिळविले. तसेच चौथ्या क्रमांकाचे 25 हजाराचे बक्षीस नागनाथ प्रसन्न बेकिनकेरे व डम्बोली, पाचव्या क्रमांकाचे 21 हजार रुपयांचे बक्षीस मुचंडी व हल्याळ येथील महालक्ष्मी प्रसन्न, सहावा क्रमांक नेसरी येथील मष्णाई देवी, सातवा क्रमांक मोदेकोप येथील नारायण लक्ष्मण कार्वेकर यांच्या बैलजोडीने, आठवा क्रमांक कालकुंद्री व कालेवाल येथील कलमेश्वर प्रसन्न, नववा क्रमांक तुर्केवाडी व बेळगुंदी येथील रवळनाथ कलमेश्वर प्रसन्न बैलजोडीने मिळविला. दहावा क्रमांक अजरा येथील संकेत जोतिबा खामकर यांच्या बैलजोडीने मिळविला. याचबरोबर एकूण 17 बक्षिसे देण्यात आली.
कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण
लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक भावकेश्वर प्रसन्न कुप्पटगिरी व कलगीनकोप या बैलजोडीने मिळवत 21 हजार रुपयाचे बक्षीस पटकावले. तृतीय क्रमांक आमनगी येथील मल्लिकार्जुन प्रसन्न, चौथा क्रमांक तुर्केवाडी व आमरोळी येथील रवळनाथ प्रसन्न, पाचवा क्रमांक शिनोळी व बागिलगे येथील रवळनाथ प्रसन्न, सहावा क्रमांक सुळेभावी येथील महालक्ष्मी प्रसन्न, सातवा क्रमांक के. के. कोप येथील मारुती कऱ्याम्मा प्रसन्न, आठवा क्रमांक नंदगड येथील मोरया प्रसन्न, नववा क्रमांक होसूर व मुरगोड येथील ग्रामदेवी प्रसन्न, दहावा क्रमांक हल्याळ येथील सर्जा फॅन्स क्लब या बैलजोडीने मिळविला. याचबरोबर एकूण विजेत्या 15 बैलजोड्यांना बक्षिसे देण्यात आली.विविध मान्यवरांच्या हस्ते व श्रीराम सेना हिंदुस्थान शाखा देसूरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.