जय भवानी, जय शिवाजी!
शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमणार गोवा : व्याख्याने, नाटके, चित्रपट, मिरवणुकांची रेलचेल
पणजी : आज संपूर्ण गोव्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असणार आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शिवचरित्राच्या विचारांनी राज्य आज भारावून जाणार आहे.
गोवा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम फर्मागुडी येथे सकाळी 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्याशिवाय पणजी, पर्वरी, म्हापसा, कळंगुट, शिवोली, पेडणे, डिचोली, वाळपई, धारबांदोडा, फोंडा, सांगे, केपे, काणकोण, मडगाव, मुरगाव व इतर भागांत सकाळपासूनच प्रतिमापूजन, अभिवादन आणि प्रभातफेऱ्यांना सुऊवात होणार आहे. युवकांकडून भव्य मोटारसायकल रॅली आणि पदयात्रांचे आयोजन करण्यात आले असून, ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी होणारे तऊण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. विविध ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि पोवाड्यांच्या सादरीकरणातून स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा दिला जाणार आहे.
इतिहास अभ्यासक आणि मान्यवर वक्त्यांच्या उपस्थितीत शिवचरित्रावरील व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवरायांचे शौर्य, किल्ले व्यवस्थापन, आरमार उभारणी आणि लोकाभिमुख राज्यकारभार या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. नव्या पिढीसमोर आदर्श नेतृत्वाची ओळख करून देण्याचा यामागील उद्देश दिसणार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजमाता जिजाऊ’, ‘गड आला पण सिंह गेला’, ‘स्वराज्यसंस्थापक’ ‘करीन ती पूर्व’, ‘जाणता राजा’ यांसारखी ऐतिहासिक नाटके रंगभूमीवर सादर होणार आहेत. तसेच चित्रपट ‘छावा’ याचे विशेष प्रदर्शन काही सांस्कृतिक संस्थांनी ठेवले आहे. या माध्यमातून इतिहासातील प्रसंग नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.
राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, पोवाडा गायन आणि निबंध लेखन यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित लघुनाट्या सादर करण्याचीही तयारी केली आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न होत आहे. काही भागांत शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण होणार असून, त्यासाठी मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. राज्य सरकारतर्फे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात अधिकृत अभिवादन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि शिवचरित्रावर आधारित विशेष प्रस्तुती होणार आहे.
शिवजयंती हा केवळ ऐतिहासिक स्मरणदिन नसून स्वाभिमान, शौर्य, संघटनशक्ती आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा संदेश देणारा दिवस आहे. स्त्राrसुरक्षा, सामाजिक सलोखा, धार्मिक सहिष्णुता आणि न्यायनिष्ठा यांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. गोव्यात आज विविध कार्यक्रमांतून शिवचरित्राचा जागर पुन्हा एकदा घुमणार असून, इतिहासाचा अभिमान आणि भविष्याची प्रेरणा यांचा संगम या उत्सवातून अनुभवायला मिळणार आहे. भगव्या पताकांखाली एकवटलेला जनसमुदाय शिवरायांच्या विचारांना उजाळा देत स्वराज्याच्या संकल्पनेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहे.