जगदीश टायटलर यांच्यावर हत्येचा आरोप निश्चित
दंगल भडकवणे, जबरदस्तीने घरात घुसून चोरी करण्याचाही ठपका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 शीख दंगल प्रकरणी दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने टायटलर यांच्यावर खून, बेकायदेशीर सभा घेणे, दंगल पसरवणे, वेगवेगळ्या गटांना एकमेकांविरोधात भडकावणे, घुसखोरी आणि चोरीचे आरोप निश्चित केले आहेत. जगदीश टायटलर यांच्यावर या आरोपांच्या आधारेच आता खटला चालणार असल्याचे विशेष न्यायाधीश राकेश सियाल यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने टायटलर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले होते.
जगदीश टायटलर यांनी दंगलखोरांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी साक्षीदारांनी आपल्या अशिलाला गोवण्याचा प्रयत्न केल्याचा टायटलरचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सीबीआयने 20 मे 2023 रोजी टायटलर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. टायटलर यांनीच जमावाला भडकावल्याचे सांगण्यात आले. यानंतर गुऊद्वाराला आग लावण्यात आली. या हिंसाचारात ठाकूर सिंग, बादल सिंग आणि गुऊचरण सिंग मारले गेले. आरोपपत्रानुसार, जगदीश टायटलर 1 नोव्हेंबर 1984 रोजी गुऊद्वारा पुल बंगशसमोर अॅम्बेसेडर कारमधून उतरल्याचा दावा एका साक्षीदाराने केला होता. यानंतर त्यांनी ‘शिखांना मारा’ असे सांगितल्यानंतर दंगल भडकल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता.
पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला
न्यायालयाने विविध गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये बेकायदेशीर सभा, दंगल, विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, बळजबरीने घरात घुसून चोरी करणे आदींचा समावेश आहे. विशेष न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी आणि पुरावे नोंदवण्यासाठी 3 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जमाव हिंसक झाल्यानंतर तीन शीखांना जाळून मारण्यात आले होते. मृतांपैकी बादल सिंग यांची पत्नी लखविंदर कौर या फिर्यादी आहेत.