हेस्कॉम शहर उपविभागात जगदीश मोहिते यांची नियुक्ती
बेळगाव : हेस्कॉमच्या शहर उपविभाग 2 कार्यालयाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंतापदी जगदीश मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे,सुमंगला बजंत्री यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वीचे साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीवकुमार सुखसारे यांची चिकोडी विभागात बदली झाल्याने हे पद रिक्त होते. मागील सहा महिन्यांपासून शहर उपविभाग 3 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता. परंतु उद्यमबाग, अनगोळ या औद्योगिक वसाहतीसह दक्षिण विभागातील महत्त्वाचा भाग या उपकेंद्रांतर्गत येत असल्याने कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची मागणी होत होती. जगदीश मोहिते यांनी यापूर्वी उद्यमबाग येथे सेक्शन ऑफिसर म्हणून सेवा बजावली आहे. त्या नंतर त्यांना बढती मिळाल्याने ते खानापूर येथे साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. यांची बदली आता शहर उपविभाग 2 मध्ये करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या स्वागतासाठी हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.