उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची जगदीप धनखड यांनी घेतली भेट
नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर दोघांची ही पहिली औपचारिक भेट आहे. जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे या पदासाठी निवडणूक झाली होती. आलिशान उपराष्ट्रपती एन्क्लेवमध्ये वास्तव्य करणारे धनखड यांनी मंगळवारी दुपारी राधाकृष्णन यांची भेट घेतली. सप्टेंबर महिन्यात राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यापासून दोघांची ही पहिली भेट आहे. चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांनी 12 सप्टेंबर रोजी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 152 मतांनी पराभुत केले होते. उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार मतदार असतात.