मरतानाही बाप-लेकीची ताटातूट, अत्यंसंस्काराला जाताना लेक-नातवावर काळाचा घाला
अंत्यसंसकारासाठी येणाऱ्या मुलगी व नातवाचा अपघातादरम्यान मृत्यु
देवरुख : लेक म्हणजे बापाचे काळीज. दोघांचाही जीव एकमेकांत गुंतलेला असतो. वडील आजारी पडले तर मुलीचा जीव आणि मुलगी आजारी पडली तर वडीलांचा जीव टांगणीला लागतो. संगमेश्वर तालुक्यातील कर्ली येथील ज्येष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते मोहन काशिराम चाळके यांच्या अंत्यसंसकारासाठी येणाऱ्या मुलगी व नातवाचा खेड येथे अपघातादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यु झाला.
या दुदैवी घटनेमुळे कर्ली गाव, चाळके व मोरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच दिवशी वडील, मुलगी व नातवावर अंत्यसंस्कार करण्याची दुदैवी वेळ कर्लीवसियांवर आली. मोहन चाळके हे सुमारे 25 वर्षे मुंबई जागेश्वरी मेघवाडी येथे शिवसेना शाखाप्रमुख होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.
जोगेश्वरी परिसरात शिवसेना वाढविण्यात चाळके यांचा सिंहाचा वाटा होता. कर्ली गावाशी त्यांच्याशी नाळ जोडली होती. गेली सहा-सात वर्षे ते कर्ली येथेच वास्तव्याला होते. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांची सदैव धडपड असे. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मोहन चाळके यांचे निधन झाले.
सोमवारी सकाळी चाळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जावई विवेक मोरे, मुलगी मिताली मोरे, नातू निहार मोरे व पाहुणे मंडळी कारने कर्ली येथे येत होती. मोरे यांच्या वाहनाला सोमवारी पहाटे 5.15 वाजता खेड येथे भीषण अपघात घडला. अपघातात विवेक मोरे हे बालंबाल बचावले. मात्र मिताली मोरे व निहार मोरे यांचा मृत्यु झाला.
शेवटी मुलीला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. एकाच दिवशी वडील, मुलगी व नातू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कर्लीवासियांवर आली. मिताली मोरे व निहार मोरे यांचे पार्थिवावर रात्री उशिरा ठाणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.