जिल्ह्यात आजपासून नवरात्रोत्सवाचा ‘जागर’! घटस्थापनेला दुर्गामाता मूर्तीची 487 ठिकाणी होणार प्रतिष्ठापना
90 ठिकाणी प्रतिमा पूजन, गरबा, दांडिया रंगणार
रत्नागिरी प्रतिनिधी
जिह्यात आज घटस्थापनेपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाचा जागर रंगणार आहे. जिह्यात 425 ठिकाणी सार्वजनिक तर 62 खासगी ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. तर 90 ठिकाणी फोटो पूजन, घरोघरी खासगी तर काही ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. आजपासून 9 दिवस दांडिया आणि गरब्याची ‘धूम’ सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना केली जात आहे. उत्सवाच्या ठिकाणी दांडियाचे कार्यक्रम करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये ग्रामदेवतांच्या मंदिरासमोर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रत्नागिरी शहरातदेखील मागील काही वर्षात नवरात्र उत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
घटस्थापनेनिमित्त देवीच्या फोटोंचे पूजन करून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन होणार आहे. 36 हजार 629 ठिकाणी खासगी तर 174 ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना केली जाणार आहे. या उत्सवाची वर्षागणिक वाढलेली रंगत आणि दांडिया स्पर्धांमध्ये विशेष करून युवा पिढीचा सहभाग लक्षात घेत राजकीय मंडळीही या उत्सवाचा राजकीय फायदा घेण्यासाठी उत्सव मंडळांना आर्थिक मदत करण्यात पुढे सरसावले आहेत.