महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनवर जगन्नाथराव शिंदे यांच्या केमिस्ट एकता पॅनेलचा विजय; स्वाभिमानी पॅनेलला धक्का

अध्यक्षपदी जगन्नाथराव शिंदे
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जगन्नाथराव शिंदे यांनी 259 मते मिळवून मदन पाटील यांचा 177 मतांनी पराभव केला. मदन पाटील यांना 82 मते मिळाली. सचिवपदाच्या निवडणुकीत अनिल नावंदर यांनी 251 मते मिळवत प्रसाद दानवे यांचा 161 मतांनी पराभव केला. दानवे यांना 90 मते मिळाली.
खजिनदारपदासाठी वैजनाथ जागुष्टे यांनी 220 मते मिळवून मुकुंद दुबे यांच्यावर 100 मतांनी विजय मिळवला. दुबे यांना 120 मते मिळाली.
उपाध्यक्षपदी सुनील भंगाळे, रामदास भोसले विजयी
दोन उपाध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सुनील भंगाळे यांनी 263, तर रामदास भोसले यांनी 238 मते मिळवून विजय संपादन केला. या निवडणुकीत अरुण बरकसे यांना 118 मते मिळाली.
संघटक सचिवपदाच्या निवडणुकीत पंकज नानवाणी यांनी 220 मते मिळवली. त्यांनी विजय पाटील यांचा 97 मतांनी पराभव केला. विजय पाटील यांना 123 मते मिळाली. सहसचिवपदी सुनील छाजड यांची बिनविरोध निवड झाली.
केमिस्ट संघटनेच्या राजकारणात नवे समीकरण
या निवडणुकीतील निकालामुळे महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाबाबत नवे समीकरण निर्माण झाले आहे. प्रमुख पदांवर केमिस्ट एकता पॅनेलच्या उमेदवारांनी मिळवलेल्या विजयामुळे जगन्नाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाला बळ मिळाले आहे. या विजयाबद्दल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राज्यभरातील केमिस्ट क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
