तिरुपती मंदिरात जगनमोहनना मनाई
वृत्तसंस्था/ तिरुपती
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती मंदिरातील दौरा रद्द केला आहे. मंदिर भेटीसंदर्भात पोलिसांनी राज्यभरातील वायएसआरसीपी नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार जगनमोहन यांच्यासह वायएसआरसीपी नेत्यांना तिरु मला मंदिरात जाण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. जगनमोहन रेड्डी शनिवार, 28 सप्टेंबर रोजी तिरु पती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात विशेष विधी करणार होते. तिरुपतीच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याच्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत सुरू झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
तिरुपती मंदिरातील भेसळप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या 9 सदस्यीय एसआयटीचे नेतृत्व गुंटूर रेंजचे आयजी उत्तम त्रिपाठी करत आहेत. 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर-काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी, वनस्पती तेल आणि माशांचे तेल मिसळल्याचा आरोप केल्यापासून वाद सुरू झाला आहे.