Kolhapur News: सावर्डे पैकी जाधववाडीत विकासाची पहाट उगवणार कधी?
सांगरूळ जोतिबा देवालयापासून या वाडीला जाण्यासाठी रस्ता आहे
By : गजानन लव्हटे
सांगरुळ : सावर्डे पैकी जाधववाडी अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील रस्ते, गटर्स, आरोग्य शिक्षण आणि पिण्याच्या पाणी या दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या सुविधांची वाणवा आहे. डोंगरातील या वाडीची दयनीय दूरवस्था पाहता जाधववाडीत विकासाचे पर्व कधी येणार? असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
सांगरूळ जोतिबा देवालयाच्या पश्चिमेकडील बाजूस तुमजाई डोंगराच्या पायथ्याशी वसलेली ही सुमारे 400 लोकसंख्येची वाडी आहे. सांगरूळ जोतिबा देवालयापासून या वाडला जाण्यासाठी रस्ता आहे. सावर्डे ग्रामपंचायतीत जायचे असले तरी नागरिकांना सांगरूळ येथे येऊन मोरेवाडी सावर्डे असा 9 दहा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
माध्यमिक शिक्षणासाठी येथील मुले सांगरूळ हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येतात. वैद्यकीय सुविधा तसेच आर्थिक व्यवहार सांगरूळ येथे असलेल्या बँकांमधून अधिक प्रमाणात होत असतो. ज्या ग्रामपंचायतीमध्ये या वाडीचा समावेश होतो त्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. या भौगोलिक असंलग्नेता परिणामही येथील विकास कामावर होत आहे.
रस्त्यांची दूरवस्था
या वाडीला जाण्यासाठी सांगरूळ मार्गे असलेला रस्ता कमी रुंदीचा आहे. शिवाय संपूर्ण रस्ता डोंगरातून असल्याने खाच खळग्याचे प्रमाण अधिक आहे. शालेय मुलांच्या प्रवासाच्या दृष्टीने हा रस्ता सुरक्षित नाही. गावच्या पश्चिमेच्या बाजूस गावतळे आहे. येथून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल वाहून येत असल्याने रस्त्यामध्ये चिखल आहे.
येथील ग्रामदैवताच्या मागील बाजूस जाधववाडी आणि सडोलकरवाडीसाठी प्राथमिक शाळा आहे. सुमारे 35 ते 40 विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या चिखलातून वाट काढत शाळेला जावे लागते.
पाण्याची टंचाई
जाधववाडी डोंगराच्या टेकडीवर वसलेली असल्याने झऱ्याच्या पाण्यावर येथील लोकजीवन अवलंबून आहे. भेकरतळे नावाने परिचित असणाऱ्या गाव तळ्याच्या पाण्याचा वापर जनावरांना पिण्यासाठी तसेच नागरिकांना पिण्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी या पाण्याचा केला जातो. उन्हाळ्यात तळ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याची टंचाई जाणवते.
पिण्यासाठी झऱ्यातील पाणी टाकीमध्ये साठवले जाते. यासाठी दोन-तीन टाक्या आणि चेंबर बांधले आहे. पण त्यांची दूरवस्था झाली आहे. टाकीमधून पाणी नळामार्फत नागरिकांना पुरविले जाते. हे पाणी कमी दाबाने येत असल्याने जमिनीबरोबर पाईपने घागरीत पाणी भरावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात झऱ्याचे पाणी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.
शिक्षणासाठी संघर्ष
स्व. आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रयत्नातून येथे प्राथमिक शाळेसाठी 3 खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. पण शाळेकडे जाण्याच्या रस्त्याची मोठी दूरवस्था आहे. येथे एसटीची सुविधा नसल्याने 4 ते 5 किलोमीटर चालत विद्यार्थी विद्यार्थिनींना सांगरूळ येथे माध्यमिक शिक्षणासाठी यावे लागते. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरकडे जाण्यासाठी सांगरूळपर्यंत पायपीट करत यावे लागते.
येथील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भात, नाचणा आणि भुईमूग ही पावसाळी पिके घेतली जातात. पावसाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना बसतो. त्यामुळे कधी कधी उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर बसतो. पावसाळ्यानंतर गवत कापून वाळके गवत विकून थोडीफार आर्थिक तरतूद करावी लागते.
विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची सुविधा नाही
"जाधववाडी आणि सडोलकरवाडी येथील मुलामुलींना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. ऊन, वारा, पावसाशी सामना करत 4-5 किलोमीटर डोंगरातून पायपीट करत सांगरूळपर्यंत यावे लागते. डोंगर भागातून पावसाळ्याच्या दिवसात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याला मोठा चढ असल्याने सायकलचा प्रवास गैरसोयीचा ठरतो. शालेय वेळेत एसटीची सुविधा व्हावी."
- समर्थ खाडे, विद्यार्थी
नेतेमंडळी मतापुरते येतात
"नेतेमंडळी मते मागण्यापुरते येतात. त्यानंतर पुन्हा येत नाहीत. त्यांनी येऊन आमचे जगणे पाहावे. चिखलामुळे मुले शाळेला जात नाहीत. ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यास पैसा नाही, असे सांगितले जाते."
- सर्जेराव आनंदा मोरे, ग्रामस्थ