62 वर्षे जुन्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये जॅकलीन
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अलिकडेच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसून आली होती. आता जॅकलीनला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. जॅकलीन आता 60 च्या दशकातील एका कल्ट हॉरर थ्रिलरच्या अधिकृत रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. 1964 मध्ये प्रदर्शित आणि राज खोंसला दिग्दर्शित चित्रपट ‘वो कौन थी’चा हा रिमेक असणार आहे. ‘वो कौन थी’ एक मिस्ट्री थ्रिलरपट होता, ज्यात मनोज कुमार, प्रेम चोप्रा आणि हेलन महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.
जॅकलीन आता याच्या रिमेकमध्ये दिसून येणार आहे. चित्रपटाची कहाणी उत्तर भारतातील एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित असेल. ख्याति मदानच्या प्रॉडक्शन अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटात जॅकलीन नोकरदार महिलेच्या भूमिकेत असेल. ही महिला स्वत:च्या आसपास घडणाऱ्या असामान्य घटनांमध्ये अडकून पडते. चित्रपटात ती अॅक्शनही करताना दिसून येणार आहे.
या चित्रपटात जॅकलीनसोबत दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसून येऊ शकतो. परंतु अद्याप याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पृथ्वीराज यापूर्वी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. मूळचा मल्याळी अभिनेता असलेल्या पृथ्वीराजचा आता देशभरात चाहतावर्ग निर्माण झालेला आहे.