टी-20 क्रमवारीत जैस्वालला जॅकपॉट
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत अनेक भारतीय खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारतीय फलंदाजानी जबरदस्त कामगिरी केली, याचा त्यांना फायदा झाला आहे. टी-20 क्रमवारीत यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अव्वलस्थानी कायम असून भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताच्या यशस्वी जैस्वालला 4 स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता दहाव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीने झिम्बाब्वाविरुद्धच्या मालिकेत खेळलेल्या 3 टी 20 सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली होती, ज्याचा त्याला फायदा झाला. कर्णधार म्हणून आपली पहिली मालिका खेळणाऱ्या शुभमन गिलला मोठा फायदा झाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या कामगिरीमुळे त्याला तब्बल 36 स्थानांचा फायदा झाला आहे. गिल आता टी-20 क्रमवारीत 37 व्या स्थानी पोहचला आहे. याशिवाय, ऋतुराज गायकवाडला एका स्थानाचा फटका बसला असून तो आठव्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा हेड अव्वलस्थानी
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे 844 रेटिंग गुण आहेत. मात्र दुसऱ्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडच्या फिल सॉल्टने सूर्याची बरोबरी केली आहे. सुर्याचे 797 गुण आहेत. सॉल्ट देखील 797 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर पाकिस्तानचे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान आहेत. याशिवाय, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सातव्या, वेस्ट इंडिजचा ब्रँडन किंग नवव्या, जॉन्सन चार्ल्स दहाव्या स्थानी आहे. या सर्वांना प्रत्येकी एका स्थानाचा फटका बसला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा रशीद अव्वल
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानी कायम असून, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दुसऱ्या व अफगाणचा रशीद खान तिसऱ्या स्थानी आहे. टॉप 10 मध्ये मात्र एकही भारतीय गोलंदाज नाही. अक्षर पटेल हा तेराव्या स्थानी आहे.
सांघिक क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा
आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेतही टीम इंडियाने घवघवीत यश मिळवले. याचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत भारतीय संघ 266 गुणासह प्रथम स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियन संघ 256 गुणासह दुसऱ्या स्थानी असून इंग्लंड 253 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीज चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे.