‘द शॅडोज एज’मध्ये जॅकी चेन
अॅक्शन स्टार जॅकी चेनने स्वत:चा आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट द शॅडोज एजचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दक्षिण कोरियन बँड सेवेंटीनचे सदस्य जून देखील दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन लॅरी यांग यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी राइड ऑन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
द शॅडोज एज या चित्रपटात झांग जी फेंग, टोनी लेउंग का-फई आणि अन्य कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले आहे. तसेच जॅकी चेनने चित्रपटाच्या सेटवरील स्वत:ची काही छायाचित्रे शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. द शॅडोज एज या चित्रपटात जॅकी चेन मकाऊ पोलीस विभागातील देखरेख तज्ञ हुआंग दे झोंगची भूमिका साकारत आहे. हुआंगला चोरांच्या एका समुहाला पकडण्याची जबाबदारी सोपविली जाते आणि तो युवा पोलिसांसोबत मिळून ही मोहीम फत्ते पाडत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. जॅकी चेनचा लॅरी यांगसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. राइड ऑनमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. हा चित्रपट जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चिनी चित्रपट ठरला होता.