कॅन्सर संशोधनासाठी फणसाची पाने जर्मनीला
लांजा / नसिर मुजावर :
येथील 31 वर्षीय मिथिलेश देसाई यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोन देत फणस बागायतीत क्रांती घडवली आहे. त्यांनी तालुक्यातील झापडे येथील आपल्या 28 एकर शेतीत तब्बल 70 वेगवेगळ्dया प्रजातींची फणस लागवड करून त्याचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे. विशेष म्हणजे त्यांची कंपनी जर्मनीला कॅन्सर संशोधनासाठी फणसाची पाने निर्यात करते. गतवर्षी मे महिन्यात 1 टन तर यंदा जानेवारी महिन्यात तब्बल 5 टन पाने त्यांनी जर्मनीला पाठवली आहेत. कॅन्सरवरील संशोधनात सकारात्मक निष्कर्ष समोर आल्यास लांजाचे नाव देशाच्या नकाशावर येणार आहे.
मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी केरळ येथे जाऊन 36 प्रकारच्या फणसाच्या झाडांची माहिती घेतली आणि ती आपल्या शेतात लावली. त्यातून प्रेरित होत मिथिलेश यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या शेताजवळ एक प्रयोगशाळा सुरू करून फणसाचे पोषणमूल्य, त्यावर प्रक्रिया व व्यावसायिक शक्यता यावर संशोधन सुरू केले. 2018 मध्ये मिथिलेश यांनी फणसाचे रोपवाटिका केंद्र सुरू केले. त्यांनी वडिलांच्या नावाने ’हरिश्चंद्र’ नावाची फणसाची नवीन जात विकसित केली. पहिल्या वर्षी फक्त 1 हजार रोपे विकली जात होती. पण आज दरवर्षी 25 हजार पेक्षा जास्त रोपांची विक्री होते, असे त्यांनी सांगितले. वाढत्या मागणीमुळे त्यांनी 900 शेतकऱ्यांना एकत्र करून ‘फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ स्थापन केली.
फणसाच्या शिजवलेल्या गराला शाकाहारी मांसाचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. तसेच फणसावर आधारीत चिप्स, पीठ आणि पल्प यासारख्या विविध प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आता मिथिलेश हे 11 हजार चौरस फुटांचे प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना फणस शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल, असा त्यांनी विचार करून शेतीची लागवड केली. मिथिलेश देसाई यांनी पारंपरिक शेतीला विज्ञान व व्यवसाय यांची जोड देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फणसाला बाजारपेठ मिळवून देत त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग उघडला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून महाराष्ट्रातील तऊण शेतकऱ्यांना नवा स्फूर्तीमंत्र मिळत आहे. त्यांच्या जॅकफ्रुट किंग अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने वार्षिक 1 कोटींची आर्थिक उलाढाल साध्य केली आहे.
- लांजातील फणसशेतीची ख्याती जगभर पोहोचेल
छोट्याशा गावात त्यांनी केलेली फणस शेती आज परदेशात नावारुपास आली आहे. केवळ फणस विकून नव्हे तर चक्क फणसाच्या पानाचाही योग्यप्रकारे वापर करता येईल का? याचा विचार करून जर्मनीतील कंपनीला फणसाची पाने पाठवली आहेत. या पानातून कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होण्याच्या दृष्टीने जर्मनीत यावर संशोधन सुरू आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास भारत देशात लांजाचे नाव सातासमुद्रापार पोहोचणार आहे.