मडगावचा इवान तेलीस यू-7 बुद्धिबळ स्पर्धेतील राष्ट्रीय जेता
खुल्या गटात राष्ट्रीय जेता बनणारा पहिला गोमंतकीय; स्पर्धेत मिळविले निर्भेळ यश
मडगाव : गोव्याच्या इवान आंतोनियो तेलीसने ओडिशात झालेल्या 38व्या राष्ट्रीय 7 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात राष्ट्रीय जेतेपद मिळविले. खुल्या गटात राष्ट्रीय जेतेपद मिळविणारा इवान तेलीस आता गोव्याचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. येथील मनोविकास स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या इवान तेलीसला प्रकाश सिंग यांचे प्रशिक्षण लाभले होते.
या स्पर्धेचे आयोजन ओडिशा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अधिपत्याखाली केले होते. स्पर्धा ओडिशातील खोर्डा येथील केटी ग्लोबल स्कूलच्या सभागृहात झाली. अपराजित राहून इवानने स्पर्धेत निर्भेळ यश संपादन केले. गेल्या वर्षी गोव्याच्या प्रयांक गावकरचे 7 वर्षांखालील राष्ट्रीय जेतेपद थोडक्यात हुकले होते व त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र इवानने ती कसर भरून काढताना जेतेपदालाच गवसणी घातली. या स्पर्धेत इवानचे मानांकन बारावे होते. मडगावच्या इवानने 9 पैकी 8.5 गुणांची कमाई करून राष्ट्रीय जेतेपदाला गवसणी घातली. 1481 आंतरराष्ट्रीय रेंटींग असलेल्या इवानने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आठ विजय मिळविले व एक सामना बरोबरीत सोडविला.
इवानने प्रथम तेलंगणाच्या निधान दिनेशला पराभूत केले. त्यानंतर लागोपाठ दोन विजय मिळविताना महाराष्ट्रच्या लक्ष सत्येन जैन व पश्चिम बंगालच्या जैनेश भौमिकला पराभूत केले. त्याचा हरियाणाच्या रिनेक सिंगविरूद्धचा सामना बरोबरीत सुटला. चार सामन्यांतून 3.5 गुणांची कमाई केल्यानंतर इवानची कामगिरी सुसाट झाली. त्याने पाचव्या सामन्यात कर्नाटकच्या बी. युवाण्यकला, सहाव्या सामन्यात पश्चिम बंगालच्या काझी अद्यान अहमदला, सातव्या सामन्यात राजस्थानच्या पार्थ सोनीला, आठव्या सामन्यात तेलंगणाच्या श्रेयांश थूमतीला तर शेवटच्या लढतीत बिहारच्या विष्णू वैभवला पराभूत केले व राष्ट्रीय जेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत पुदूचेरीच्या दुवेश मिलनला 7.5 गुणानी राष्ट्रीय उपविजेतेपद, महाराष्ट्रच्या अंश दाढिचला तिसरे, कर्नाटकच्या विवान वर्धन साहूला चौथे तर बिहारच्या विष्णू वैभवला 7 गुणानी पाचवे स्थान मिळाले. इवान तेलीस हा ‘लंबे रेस का घोडा’ असल्याचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी म्हणाले. यंदा 7 वर्षांखालील राज्य बुद्धिबळ स्पर्धेचा राज्य जेता असलेला इवानचे बुद्धिबळ खेळातील कसब भारी असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांत निश्चितच पदके मिळविणार असल्याचे केणी म्हणाले. इवानच्या सुवर्णमय कामगिरीने गोवा बुद्धिबळ संघटनेला आनंद झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर म्हणाले. राष्ट्रीय स्पर्धांतील गोव्याच्या खेळाडूंची कामगिरी बहरत असून त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमीच उंचावत आहे. राज्य बुद्धिबळ संघटनेने नेहमीच बुद्धिबळपटूंच्या उत्कर्षासाठी काम केले आहे व पुढेही करणार असल्याचे कांदोळकर म्हणाले.