मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायक !
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार, घेतली इटली आणि कतारच्या प्रमुखांची भेट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि कतारचे प्रमुख शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेतली आहे. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या प्रसंगाचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या या कृतीला उद्देशून त्यांनी ‘मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायक असते’ असे उद्गार काढले आहेत. ही भेट शुक्रवारी झाली होती.
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी शुक्रवारी झालेल्या या भेटीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सेल्फी घेतली होती. ती त्यांनी सोशल मिडियावर प्रसिद्धी केली. ‘मी माझ्या सन्मित्राला भेटले’ असा उल्लेख छायाचित्राखाली करत, त्यांनी ‘मेलोदी’ असाही उल्लेख केला आहे. आपले स्वत:चे नाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाचे शेवटचे अक्षर जोडून त्यांनी मेलोदी असा केलेला उल्लेख विषेश स्वारस्यपूर्ण ठरला आहे. साहजिकच त्यांचे संदेश लोकप्रिय झाला आहे.
अनेक नेत्यांच्या भेटी
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई येथे आयोजित जागतिक वातावरण कृती शिखर परिषदेसमोर भाषण केले होते. त्यानंतर त्यांनी या परिषदेला उपस्थित अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. या परिषदेला पर्यावरण सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याही भेटी त्यांनी घेतल्या. बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमर मोटली, गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली, स्वीस संघटना अध्यक्ष अलेन बर्सेट, नेदरलँडचे पंतप्रधान मार्ग रुट, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनॅशिओ आदी नेत्यांची भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
भरडधान्यांविषयी प्रस्ताव
भारताने दुबईमधील परिषदेत भरड धान्यांच्या गुणवत्तेचे निकष निर्धारित करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. पंतप्रधान मोदी यांनी भारतात ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी भरड धान्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहारात व्हावा यासाठी अभियान हाती घेतले आहे. या धान्यांचा उपयोग वाढला तर त्यांचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाईल, असे अनुमान आहे. केवळ गहू, तांदूळ आणि मका अशा पीकांवर अवंबून राहणे आता मानवाला परवडणार नाही, असे तज्ञांचेही मत आहे.
करारच्या प्रमुखांशी भेट
कतारमध्ये नुकतीच भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात या अधिकाऱ्यांनी अपील केले असून ते सुनावणीसाठी स्वीकारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी करार देशाचे प्रमुख हमद अल थानी यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा कोणती झाली हे समजू शकलेले नाही. मात्र, भारतीय अधिकाऱ्यांविषयीही चर्चा झाली असावी, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय तंत्रज्ञ आणि कर्मचारी कामाला आहेत. त्यांच्या हितरक्षणाविषयी त्यांची कतारच्या प्रमुखांशी चर्चा झाली, असे नंतर भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोपांचा इन्कार
भारतीय नौदल अधिकाऱ्यांनी कतारमध्ये प्रशिक्षण देत असताना इस्रायल या देशासाठी हेरगिरी केली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो सिद्ध झाल्याचेही नंतर घोषित करण्यात आले होते. तथापि, या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला असून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीच देण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताने या शिक्षेविरोधात अपील केले असून अपीलाची सुनावणी योग्य प्रकारे व्हावी, अशी भारताची मागणी आहे.
पंतप्रधान मोदी यांचे महत्वाचे प्रस्ताव
ड दुबई येथील परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनेक महत्वाचे प्रस्ताव
ड अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी, द्विपक्षीय संबंध, जागतिक स्थितीची चर्चा
ड आहारात भरड धान्यांच्या उपयोगासंबंधीचा भारताचा प्रस्ताव अतिमहत्यपूर्ण
ड पर्यावरण संरक्षणात भारताची भूमिका सकारात्मक असल्याची केली स्पष्टोक्ती