शेजाऱ्यांना दोष देण्याची पाकला खोडच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपल्या देशातील अपयशासाठी शेजारच्या देशांना दोष देण्याची पाकिस्तानची खोड जुनीच आहे, अशा शब्दांमध्ये भारताने पाकिस्तानची खिल्ली उडविली आहे. पाकिस्तानने नुकताच अफगाणिस्तानाच्या एका भागावर विमान हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 40 हून अधिक निरपराध नागरिक प्राणास मुकले होते. अफगाणिस्तात आपल्या विरोधात याच भागातून कारवाई करतो, असा आरोपही पाकिस्तानने वायू हल्ला केल्यानंतर केला होता. या हल्ल्यासंदर्भात भारताच्या विदेश विभागाचे मुख्य प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दशकांपासून सीमावाद होत आहे. अफगाणिस्तानने स्वत:चा देश आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा मानण्यासच नकार दिला आहे. ही रेषा ड्यूरँड रेषा म्हणून ओळखली जाते. ब्रिटिशांनी जेव्हा भारताला खंडित स्वातंत्र्य दिले, तेव्हा ही रेषा निर्माण केली होती. तथापि, त्यावेळेलाही ही रेषा मानण्यास अफगाणिस्तानने नकार दिला होता.
पाकने मारले निरपराध नागरिक
24 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर वायू हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह 46 जण ठार झाले होते. ते सर्व निरपराध नागरिक होते, असा अफगाणिस्तानचा दावा आहे. त्यामुळे या देशाने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी 15 हजारांची एक विशेष सेना तयार केली असून या सेनेने पाकिस्तानच्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. काही चौक्यांवरील पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आले आहे. तर अनेक चौक्या सोडून पाकिस्तानी सैनिकांनी पलायन केले आहे, अशी वस्तुस्थिती तज्ञांनी स्पष्ट केली आहे.
सात खेड्यांवर बाँबफेक
पाकिस्तानच्या विमान हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सात खेड्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या खेड्यांमध्ये पाकिस्तानातून अफगाणिस्तानात स्थलांतरित झालेले शरणार्थी रहात आहे, असा पाकिस्तानचा दावा आहे. याच शरणार्थींना हाताशी धरुन अफगाणिस्तान पाकिस्तानविरोधात हिंसक कारवाया करीत आहे. या कारवाईचा आम्ही बंदोबस्त करू अशी फुशारकी पाकिस्तानने मारली आहे. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे.