‘आयटीसी’ 20 हजार कोटींची करणार गुंतवणूक
आगामी 5 वर्षांसाठी गुंतवणुकीचे नियोजन : एफएमसीजी आणि इन्फोटेक व्यवसायांवर लक्ष केंद्रीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात कार्यरत दिग्गज कंपनी आयटीसी भारताच्या आर्थिक विकासावर आत्मविश्वास राहिल्याने पुढील पाच वर्षांत 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी दिली आहे.
पुरी यांनी कंपनीच्या 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले की आयटीसी ‘भविष्यातील तंत्रज्ञान, हवामान-अनुकूल, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय उपक्रम’ तयार करून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी देशाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.
पत्रकार परिषदेत पुरी म्हणाले, ‘अल्पकालीन आव्हाने असूनही, आम्ही भारतातील संधींबाबत आशावादी आहोत.’ गुंतवणुकीची माहिती देताना ते म्हणाले की, एफएमसीजी व्यवसायात 35 ते 40 टक्के इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. त्याच वेळी, पेपरबोर्ड आणि पॅकेजिंगसाठी हा आकडा 30-35 टक्के असेल. उर्वरित गुंतवणूक शेतीसह इतर व्यवसायांमध्ये करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आयटीसीमध्ये सध्या 11 एकात्मिक ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि लॉजिस्टिक युनिट्स आहेत. पुरी म्हणतात, ‘परंतु काहींचा पूर्णपणे उपयोग झालेला नाही, काहींना अधिक उत्पादन आणि यंत्रसामग्री वाढीस वाव आहे कारण आम्ही एफएमसीजी क्षेत्रातील एक मोठा खेळाडू बनण्यासाठी पायाभूत सुविधा उभारत आहोत.’ असेही पुरी यांनी स्पष्ट केले आहे.