आयटीसी-रिलायन्सच्या घसरणीने बाजार प्रभावीत
सेन्सेक्स 239 अंकांनी नुकसानीत : जागतिक संकेत मात्र सकारात्मक
मुंबई :
भारतीय शेअर बाजार चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात पुन्हा घसरणीत राहिला आहे. यामध्ये एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील समभाग घसरले आहेत. जागतिक बाजारपेठेत सकारात्मक कल असूनही, बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. चढ-उताराच्या प्रवासात बाजार बहुतेक वेळा घसरणीतच राहिला आहे.
निर्देशांकात मोठे वजन असलेल्या आयटीसी आणि रिलायन्स समभागांमध्ये घसरण झाल्याने बाजार घसरला. व्यापक बाजारात निफ्टी मिडकॅप-100 0.02 टक्क्यांनी किंचित घसरून बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी स्मॉलकॅप-100 0.33 टक्क्यांनी वाढीसह बंद झाला.
बीएसई सेन्सेक्स 100 अंकांपेक्षा जास्त घसरून 81,457 वर उघडला. तो अखेर 239.31 अंकांनी घसरून 81,312.32 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेरच्या क्षणी 73.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 24,752.45 वर बंद झाला.
एलआयसीचे समभाग 8 टक्क्यांनी तेजीत
सरकारी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) चे समभाग हे बुधवारी जवळजवळ 8 टक्क्यांनी वधारले. कंपनीच्या समभागांमध्ये ही वाढ मार्च तिमाहीतील चांगल्या निकालांमुळे झाली. आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 38 टक्क्यांनी वाढून 19,012 कोटी रुपये झाला. खर्चात घट झाल्यामुळे कंपनीला नफ्यात मोठी वाढ झाली.
निफ्टी 50 मधील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर आयटीसी, ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने मागील बंदच्या तुलनेत 4.8 टक्क्यांच्या सवलतीने 1.5 अब्ज डॉलर्स किमतीचा 2.5 टक्के हिस्सा विकल्यानंतर 3.2 टक्क्यांनी घसरला. या घसरणीमुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1.5 टक्क्यांवर खाली आला.
जागतिक बाजारपेठेतील संकेत
आशियाई बाजारपेठेत तेजी दिसून आली. ही वाढ वॉल स्ट्रीटमुळे झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईयू आयातीवरील 50 टक्के कर लागू करण्याची अंतिम मुदत 9 जुलैपर्यंत वाढवल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावना सुधारल्या. निक्केईने 0.69 टक्के वाढ केली. कोस्पी 1.42 टक्के आणि एएसएक्स 200 0.4 टक्के वाढले. मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 348.45 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. याप्रमाणे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) 27 मे रोजी 10,104.66 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.