इटलीचा सिनर उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या पॅरीसम मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या द्वितीय मानांकित जेनिक सिनरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना तिसऱ्या फेरीतील सामन्यात सेरुनडोलोचा पराभव केला. तसेच त्याने इनडोअर स्पर्धांमध्ये आपली एकेरीतील सलग 23 सामने जिंकण्याची विजयी घोडदौड कायम राखली आहे.
चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या 2025 च्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेपूर्वी पुरुषांच्या मानांकनात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला अग्रस्थानावरुन खाली खेचण्यासाठी सिनेरला पॅरिसमधील ही स्पर्धा जिंकावी लागेल. सिनरने तिसऱ्या फेरीतील सामन्यात सेरुनडोलोचा 7-5, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. आता उपांत्यपूर्व फेरीत सिनरची लढत अमेरिकेच्या बेन शेल्टनबरोबर होणार आहे. बेन शेल्टनने तिसऱ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा 7-6 (8-6), 6-3 असा पराभव केला. गेल्या रविवारी व्हिएन्ना येथील झालेली एटीपी स्पर्धा सिनरने जिंकली होती. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात सिनरने आतापर्यंत पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीचा टेनिसपटू तसेच या स्पर्धेतील माजी विजेत्या व्हेरेव्हने 15 व्या मानांकित फोकीनाचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. 40 व्या मानांकित व्हॅलेंटीन व्हॅचेरोटने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरुची आव्हान 7-6 (7-4), 6-4 असे संपुष्टात आणले. कॅनडाच्या नवव्या मानांकित अॅलिसिमेने अल्टमेयरचा 3-6, 6-3, 6-2, बुबलिगने अमेरिकेच्या टेलर फ्रिझचा 7-6 (7-5), 6-2 त्याचप्रमाणे या स्पर्धेत 2018 साली विजेतेपद मिळविण्यासाठी डी. मिनॉर तसेच मेदव्हेदेव यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरने कॅचेनोव्हचा 6-2, 6-2 तर रशियाच्या मेदव्होदेवने इटलीच्या सोनेगोचा 3-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. 2025 च्या एटीपी फायनल्स स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा डी. मिनॉर सलग दुसऱ्या हंगामासाठी पात्र ठरला आहे.