इटलीचा आयर्लंडवर ऐतिहासिक विजय
ऐतिहासिक विजय मिळविणारे इटलीचे खेळाडू
वृत्तसंस्था / दुबई
इटलीने सोमवारी दुबई येथील द सेव्हन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडचा चार गडी राखून पराभव करत कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राविरुद्ध आपला पहिला ऐतिहासिक विजय नोंदविला. या ऐतिहासिक विजयानंतरही त्यांनी तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 1-2 ने गमविली. टी-20 आंतरराष्ट्रीय संघांच्या क्रमवारीत इटली 28 व्या स्थानावर आणि आणि आयर्लंड 11 व्या स्थानावर आहे.
पूर्ण सदस्य राष्ट्राविरुद्धच्या या पहिल्या विजयात, ग्रँट स्टीवर्टने शेवटच्या षटकात मारलेल्या सलग तीन षटकांच्या मदतीने इटलीने तीन चेंडू बाकी असताना सामना जिंकला. त्याने 19 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. 155 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली. इटलीचा कर्णधार वेन मॅडसेनने 30 चेंडूत 39 धावांची खेळी करत आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. जेव्हा सेट फलंदाज जियान पिएरो मीड (19 चेंडूत 22 धावा) बाद झाला, तेव्हा इटलीला शेवटच्या चार षटकांत 44 धावांची गरज होती. दुसऱ्या टोकाकडून धावा काढण्यासाठी झगडत असलेल्या स्टुअर्टला साथ देण्यासाठी मार्कस कॅम्पिपियानो क्रीजवर आला. या जोडीने पुढील दोन षटकांत 14 धावा जोडल्या. ज्यामुळे इटलीला शेवटच्या दोन षटकांत 30 धावांची गरज होती. त्यांनी मार्क अडायरच्या पुढील षटकांत दोन चौकारांसह 14 धावा वसुल केल्या. आता इटलीला शेवटच्या षटकांत विजयासाठी 16 धावांची गरज होती आणि त्यानंतर एक चमत्कार घडला. स्टुअर्टने बॅरी मॅकार्थीच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारुन आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला.
यापूर्वी तिसऱ्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेक जिंकून इटलीने आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने धडाकेबाज सुरूवात केली. परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज अली हसनने तिसऱ्या षटकांत सलामीवीर रॉस अडायरला बाद करुन आयर्लंड संघाला बॅकफूटवर ढकलले. हॅरी टेक्टरने (9 चेंडूत 13 धावा) आपल्या कर्णधारासोबत दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. परंतु तो जास्तवेळ टिकू शकला नाही. कारण क्रिशन कालुगामगेने त्याला आठव्या षटकांत बाद केले. त्याच षटकांत लॉर्कन टकरही बाद झाला. स्टर्लिंग एका टोकाकडून चौकार मारत राहिला. पण 38 चेंडूत 45 धावा केल्यानंतर तोही 12 व्या षटकात कालुगामगेच्या गोलंदाजीवर बाद झाला. मधल्या फळीत बेन कॅलिट्झने 12 चेंडूत 22 धावांची वेगवान खेळी केली. गॅरेथ डेलानी (14 चेंडूत 18) धावा आणि मार्क अडायर 21 चेंडूत 25 धावा केल्या. यामुळे आयर्लंडने 154 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कालुगामगे इटलीसाठी 4 षटकात 28 धावा देवून 3 गडी बाद केल्याने तो यशस्वी गोलंदाज ठरला. स्टुअर्ट आणि जेजे स्मट्स यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.
आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषकाची 10 वी आवृत्ती 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 8 मार्चपर्यंत चालेल. इटलीला गट सी मध्ये स्थान देण्यात आले आहे. जिथे ते दोन वेळचे विजेते इंग्लंड आणि वेस्ट इंडिज तसेच बांगलादेश आणि नेपाळ यांच्याशी स्पर्धा करतील. अझुरी संघ आपल्या टी-20 विश्वचषक मोहीमेची सुरूवात 9 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर स्कॉटलंडविरुद्ध करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळचा सामना करेल.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 19.4 षटकांत सर्वगडी बाद 154 (पॉल स्ट&िंग 45, मार्क अडायर 25, क्रिशन कालुगामागे 3-28). इटली 19.3 षटकांत 7 गडी बाद 157 (वेन मॅडसेन 39, ग्रँट स्टुअर्ट नाबाद 33, मॅथ्यू हम्फ्रिज 2-23).